‘हिंदुत्वाची प्रयोगशाळा’ म्हणविल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये गेले दोन आठवडे जे सुरू आहे, त्यावरून या प्रयोगाच्या प्रक्रियेविषयीच एकूण संशय निर्माण होतो..

आपल्याच धर्मातील एक मोठा घटक मेलेल्या जनावरांचे चामडे सोलण्यावर आपला उदरनिर्वाह चालवतो हे या मंडळींच्या गावीही नाही. या पक्षातील काहींना दलितांवर झालेला हल्ला योग्यच होता, गाईंना मारणाऱ्यांना असे प्रत्युत्तर देणे काहीही गैर नाही, असेच वाटते.. मग या पक्षाचे सर्वसमावेशक, विकासाभिमुख हिंदुत्व म्हणजे नक्की काय?

गुजरात हा आतापर्यंत हिंदुत्वाची प्रयोगशाळा मानला जात होता. परंतु गेले दोन आठवडे या प्रयोगशाळेत जे काही सुरू आहे त्यावरून या प्रयोगाच्या प्रक्रियेविषयीच एकूण संशय निर्माण होत असून त्यामुळे या प्रयोगाचे पुढे होणार तरी काय, हा प्रश्न आहे. तो पडावयाचे कारण म्हणजे गोमातेच्या रक्षणाच्या मिषाने उना येथील काही स्वघोषित गोरक्षकांनी दलितांना केलेली मारहाण. हे दलित गाईस ठार करून तिचे मांस काढत होते, असा या स्वघोषित गोरक्षकांचा सोयीस्कर समज झाला. वास्तविक हे दलित सिंहाने मारलेल्या गाईची कातडी काढण्याच्या कामात मग्न होते. परंतु हे वास्तव समजून न घेताच या स्वयंभू गोरक्षकांनी त्यांनीच गाईला मारले असा समज करून घेतला. यामुळे सात्त्विक संताप येऊन ते कायदा हातात घेते झाले. तो घेऊन त्यांनी गोमातेचे मांस काढणाऱ्यांना सालटी निघेपर्यंत बेदम मारले. त्याची ध्वनिचित्रफीत माध्यमांतून फिरू लागल्यावर आणि मायावती यांनी संसदेत त्या संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यावर या प्रश्नाचे गांभीर्य संबंधितांच्या ध्यानी आले आणि वारे फिरले. देशभरातून या संदर्भात नाराजी व्यक्त झाल्यानंतर गुजरातेत आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपला त्याची दखल घ्यावी लागली आणि एकंदरच वातावरण कसे निवळेल यासाठी प्रयत्न करावे लागले. परंतु त्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. रविवारी साबरमती येथे झालेले विराट दलित संमेलन हे याचे उदाहरण. या संमेलनात जमलेले दलित बांधव यापुढे आपण मेलेल्या गाईची कलेवरे हाताळणार नाही, असा निर्धार करीत असताना तिकडे उत्तर प्रदेशात भाजपने दलित मेळावा भरवण्याचा प्रयत्न केला. हे दोन मेळावे दलितांची भाजपसंदर्भात भूमिका काय आहे, ते स्पष्ट करतात. साबरमती येथील मेळाव्यात दलितांची उत्स्फूर्त गर्दी होती, तर उत्तर प्रदेशातील मेळाव्यात पाचशेदेखील दलित कार्यकर्ते फिरकले नाहीत.

याचे कारण भाजपचा दलितांविषयीचा दृष्टिकोन. काँग्रेसने देशातील राजकारणात आपला पाया पक्का करताना अल्पसंख्याकांना मोठय़ा प्रमाणावर जवळ केले. दलित, मुस्लीम आदींची भक्कम युती काँग्रेसच्या पाठी उभी राहिली. त्यास शह देण्यासाठी भाजपने अन्य मागास जमाती आणि पक्षाचा मूळचा पाया असलेला ब्राह्मण वर्ग यांना चुचकारले. ब्राह्मण पारंपरिक विचारधारेच्या आधारे भाजपकडे होतेच. तेव्हा त्यांना जवळ करण्यासाठी भाजपला तसे फारसे काही कष्ट करावे लागले नाहीत. परंतु अन्य मागासवर्गीय ही मात्र खास भाजपची मिरासदारी. संघाच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या योजनेबरहुकूम भाजपने अन्य मागासांची चांगलीच मोट बांधली. परंतु दलितांना तितक्या प्रमाणात आकृष्ट करणे भाजपला जमले नाही. त्या पक्षाच्या गताध्यक्षांच्या नावावर एक नजर जरी टाकली तरी ही बाब स्पष्ट व्हावी. एक बंगारू लक्ष्मण यांचा अपवाद वगळला तर भाजपला आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अन्य दलित व्यक्ती आढळलेली नाही. हे बंगारू लक्ष्मणदेखील केविलवाण्या अवस्थेत गेले. तहलकाच्या जाळ्यात लाच घेताना ते आढळल्यानंतर त्यांना ज्या पद्धतीने भाजपने वाऱ्यावर सोडले ते पाहता भाजप निरीक्षकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला- तो म्हणजे बंगारू दलित नसते तर ना घरका ना घाटका अशी त्यांची अवस्था झाली असती का? तेव्हा भाजपला दलित भावनांवर फुंकर घालता आली नाही, हे नक्की. ही बाब तशी खपूनही गेली असती. परंतु दरम्यानच्या काळात भाजपच्या तंबूत घुसलेल्या नवहिंदुत्ववाद्यांनी पक्षाची अडचण केली. मूळच्या भाजपच्या हिंदुत्ववादी भगव्या रंगापेक्षा या नव्याने आलेल्यांचा केसरिया रंग हा हिंदुत्वाच्या प्रश्नावर अधिक गडद होता. आणि आहेही. आपणच अधिक कडवे हिंदुत्ववादी असे या सर्वाचे वागणे असते. वास्तविक या नवहिंदुत्ववाद्यांचा हिंदुत्ववाद हा एका अर्थाने ब्राह्मणवाद आहे. तो हिंदू धर्मातील अन्य प्रवाहांना मानत नाही. त्याचमुळे गोमाता ही आपल्यासाठी पवित्र वगैरे असली तरी आपल्याच धर्मातील अन्यांसाठी ती चरितार्थाचे साधन असू शकते हे या वर्गास मान्य नाही. म्हणूनच आपल्याच धर्मातील एक मोठा घटक मेलेल्या जनावरांचे चामडे सोलण्यावर आपला उदरनिर्वाह चालवतो हे या मंडळींच्या गावीही नाही. या बाबत त्यांची मग्रुरी इतकी की इतके सगळे होऊनही या पक्षातील काहींना दलितांवर झालेला हल्ला योग्यच होता, गाईंना मारणाऱ्यांना असे प्रत्युत्तर देणे काहीही गैर नाही, असेच वाटते. तसे त्यांनी बोलूनही दाखवले आहे. त्यामुळेच हे सर्व पाहता पडणारा प्रश्न म्हणजे मग या पक्षाचे सर्वसमावेशक, विकासाभिमुख हिंदुत्व म्हणजे नक्की काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दशकभराच्या गुजरात मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांनी हे विकासाभिमुख राजकारण केल्याचा आणि गुजरातेत सामाजिक समरसता प्रस्थापित केल्याचा दावा केला जातो. त्यात त्यांना यश आले असे मानावयाचे तर आता जे काही गुजरातेत सुरू आहे, त्याचा अर्थ कसा लावावयाचा? मोदी यांचे तेव्हाचे यश हे अगदी दोन वर्षांत ओसरण्याइतके तात्कालिक होते काय? भाजपमधील एका गटाच्या दृष्टिकोनातून दलितांवर हल्ले आदी जर योग्यच असेल तर मग उत्तर प्रदेशात मोठा गाजावाजा करून काढण्यात आलेल्या धम्म चेतना यात्रेचा अर्थ काय? या यात्रेचे सारथ्य करणारे उत्तर प्रदेश भाजपचे नवनियुक्त प्रमुख केशव प्रसाद मौर्य यांनी दलितांसाठी भाजप हा एकमेव आशेचा किरण असल्याचे म्हटले आहे. हे जर खरे असेल तर या आशेच्या किरणास प्रतिसाद देण्यासाठी दावा केल्यानुसार ५० हजार सोडा, पण ५०० दलितबांधवदेखील का जमले नाहीत? हे मौर्य दलित आहेत. निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे पक्षाध्यक्षपद हाती आल्यावर त्यांना धम्म चेतना यात्रा काढण्याची गरज वाटली. याआधी त्यांनी दलितांना भाजपच्या प्रवाहात मिसळता यावे यासाठी किती प्रयत्न केले? ते केले असे जर मानले तर भाजपचेच दुसरे दलित नेते, खासदार उदित राज यांना मात्र सध्या जे काही सुरू आहे त्यामुळे दलितांनी देशभरात पेटून उठावे असे वाटते, ते का? या संदर्भात राज यांनी विचारलेला प्रश्न उदासवाणा आहे. गुजरातसारखे प्रकार जेव्हा घडतात तेव्हा त्याचा निषेध करण्यासाठी पक्षातील केवळ दलित नेतेच कसे काय पुढे येतात? हे प्रकार मानवतेलाच कलंक आहेत. तेव्हा त्याचा निषेध करावयास हवा असे बिगर दलित नेत्यांस का वाटत नाही, असा त्यांचा प्रश्न आहे. दलितांना सामावून घेतल्याखेरीज भाजपचा राष्ट्रवाद कसा काय प्रत्यक्षात येऊ शकतो, असेही ते विचारतात? हा त्यांचा प्रश्न सत्ताधाऱ्यांच्या वर्मावर घाव घालणारा आहे.

म्हणूनच या प्रश्नावर सर्वोच्च सत्ताधाऱ्यांनी काही सुयोग्य भाष्य करून सर्वानाच सबुरीचा सल्ला देणे गरजेचे होते. या प्रश्नावर दोन्ही बाजूंनी भडकलेली माथी पाहता या सल्ल्याची गरज होती. त्यासाठी वास्तविक रविवारची मन की बात उपयोगी ठरली असती. पण तसे झाले नाही. या मन की बातमधे पंतप्रधानांनी नवजात अर्भकांचे मृत्यू कसे रोखायला हवेत, यावर मार्गदर्शन केले. परंतु तितक्याच ‘नवजात’ आणि स्वयंभू गोरक्षकांकडून होणाऱ्या मृत्यूंबाबतही ते तितक्याच पोटतिडकीने बोलले असते तर बरे झाले असते. याआधी पंतप्रधानांनी रिओ येथे ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या पथकांस मने जिंकून येण्याचा सल्ला दिला. ते ठीकच. परंतु त्याच वेळी त्यांच्याच पक्षीयांकडून काहींची मने करपवण्याचा उद्योग सुरू आहे, तो थांबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली असती तर तेदेखील अधिक उचित ठरले असते. ते न झाल्याने काहींच्या मतांना महत्त्व असते, मनांस नाही असा संदेश गेला. ते काही ठीक झाले नाही.


एकही प्रतिक्रिया नाही

Comments have been closed.

लोकसत्ता 'ब्लॉग बेंचर्स'वरील ब्लॉगवर तुमची प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत तुमची प्रतिक्रिया शेअर करून त्यांना ती वाचायला आणि लाईक करायला जरूर सांगा. 'लोकसत्ता'च्या परीक्षक मंडळाच्या निर्णयाव्यतिरिक्त तुमच्या प्रतिक्रियेला मिळालेल्या लाईक्सचाही स्पर्धेचा विजेता/विजेती निवडताना विचार केला जाईल.