प्रकाश राज यांनी कलावंतांविषयी म्हणून व्यक्त केलेल्या मतांच्या पाश्र्वभूमीवर आपल्या मराठी चित्रनाटय़सृष्टीचा कानोसा घेतल्यास काय दिसते?

अलीकडच्या काळात चित्रपटबंदी, सांस्कृतिक दहशतवाद आदी वादग्रस्त मुद्दय़ांवर आवाज उठवणारे कलाकार म्हणजे प्रकाश राज. मूळचे ते दक्षिण भारतीय. पुढे चित्रवाणी आणि हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून ते लोकप्रिय झाले. प्रकाश राज हे पडद्यावरील नायक कधीच नव्हते. त्यांच्या बहुतांश भूमिका या खलनायकी आहेत. आपल्याकडे खलनायकांना प्रत्यक्ष जीवनातही चार हात दूर ठेवण्याकडे अनेकांचा कल असतो. हे या माध्यमाविषयीच्या भाबडेपणातून होते. त्याचमुळे कृष्ण, राम आदी भूमिका करणाऱ्या कलाकारांच्या पायावर प्रत्यक्षातही अनेक जण डोके ठेवतात. पडद्यावरचे नायकत्व आणि वास्तव यांचा जसा संबंध नाही तसाच चित्रपटातील खलनायकत्व आणि त्या कलाकाराची व्यक्तिगत जीवनमूल्ये यांचाही संबंध असतोच असे नाही. बऱ्याचदा आपल्याकडे उलटच दिसते. पडद्यावरचा खलनायक हा वास्तव जीवनात सहृदय असतो आणि अनेक चांगल्या कामांशी त्याचा संबंध असतो. निळू फुले हे त्याचे एक मराठी उदाहरण. पडद्यावर घृणास्पद व्यक्तिरेखा रंगवणारे निळूभाऊ प्रत्यक्ष आयुष्यात सभ्य गृहस्थच होते. त्यांच्याप्रमाणे प्रकाश राज यांच्या जीवनमूल्यांवर भाष्य करावे इतकी ती परिचित नाहीत. परंतु तरीही पडद्यावर खलनायक रंगवणाऱ्या या प्रकाश राज यांनी वास्तव आयुष्यात घेतलेली भूमिका अनेक नायक वा महानायकांतील बौद्धिक अंधारावर प्रकाश टाकणारी आहे. प्रकाश राज यांच्या या भूमिकेचे स्वागत.

कलावंत व्यवस्थेसमोर दबून राहू लागला तर तो समाजच्या समाजच दबलेल्या अवस्थेत जातो, भेदरून जातो. म्हणून घाबरणाऱ्या समाजाला आधार द्यावयाचा असेल तर कलाकारांनी ताठ मानेने उभे राहायला हवे, असे मत या राज यांनी व्यक्त केले. केरळ चित्रपट महोत्सवाचे उद्घाटक म्हणून प्रकाश राज यांनी सरकारला चार खडे बोल सुनावले इतकेच त्यांचे मोठेपण नाही. तर कलाकार म्हणून आपली भूमिका काय याची स्पष्ट जाणीव त्यांना आहे आणि ती व्यक्त करण्यात कोणतीही हयगय त्यांनी केली नाही, हे विशेष कौतुकास्पद. कलाकाराने आपणात काही विशेष वा दैवी गुण आहेत म्हणून स्वत:स मोठे समजू नये. या गुणांनी ते मोठे होत नाहीत. पण तरीही कलाकार हे दैवी वा काही विशेष गुणांचा समुच्चय असलेले भासतात कारण समाजाचे त्यांच्यावर प्रेम असते, हे राज यांचे मत वास्तवाची दुर्मीळ जाणीव दाखवून देणारे आहे. त्यांच्या मते म्हणूनच कलाकाराने या प्रेमास जागत निर्भयपणे बोलायला हवे, काही भूमिका घ्यायला हवी. ती घ्यायला कलाकार घाबरले तर त्यांच्यावर प्रेम करणारा समाजही भीतीत गुरफटून जातो, हे त्यांचे निरीक्षण निश्चितच महत्त्वाचे ठरते. या वेळी प्रकाश राज यांनी ‘सेक्सी दुर्गा’ या बंदीबळी चित्रपटाचा उल्लेख केला. धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून या चित्रपटावर बंदी घातली गेली. केरळ उच्च न्यायालयाने ती उठवल्यानंतरही चित्रपट महोत्सवात तो प्रदर्शित केला जाणार नाही, असाच प्रयत्न संबंधितांचा होता आणि त्यात ते यशस्वी झाले. दुर्गास लावलेल्या विशेषणामुळे ‘त्यांच्या’ भावना दुखावल्या गेल्या, परंतु त्यांना मद्यालयास दुर्गा नाव दिले गेले असेल तर त्याचे काही वाटत नाही किंवा दुर्गा नावाचा मार्ग घाणीने बरबटलेला असेल तरी त्याची काही चाड त्यांना नसते, हा प्रकाश राज यांचा युक्तिवाद निश्चितच बिनतोड म्हणावा लागेल. चित्रपट आणि समाजातील एकंदरीतच घटती सहिष्णुता यावर राज यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सरकार त्यांच्यावर नाराज आहे. परंतु तरीही राज हे बधलेले नाहीत. सरकारला चार खडे बोल सुनावण्याच्या त्यांच्या भूमिकेत तसूभरही बदल झालेला नाही आणि तो होण्याची चिन्हेही नाहीत. उलट अन्य कलाकारांनीही विचारस्वातंत्र्याच्या मुस्कटदाबी विरोधात उभे राहायला हवे असा त्यांचा प्रयत्न आहे. यापुढे जाऊन राष्ट्रीयत्वाचा विचार हिंदुत्वाच्या भावनेशी बांधण्यासही त्यांचा विरोध आहे. हिंदुत्व ही जीवनपद्धती आहे. पण हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असे म्हणणारे त्या धर्मभावनेच्या आडून जनतेवर अन्य काही लादू पाहतात, हे घातक आहे असे राज यांचे मत. आपल्याकडे चित्रपट कलाकार सामाजिक विषयांवर हे असे आणि इतके भाष्य करीत नाहीत. त्यामुळे प्रकाश राज यांची कृती निश्चितच शौर्य पुरस्कारलायक ठरते.

या पाश्र्वभूमीवर आपल्या मराठी चित्रनाटय़सृष्टीचा कानोसा घेणे पुरेसे बोलके ठरावे. ‘गिधाडे’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’ या अशा नाटकांचा विजय तेंडुलकरी काळ सोडला तर नंतर मराठी मनोरंजनसृष्टीत कानठळ्या बसेल इतकी शांतताच नांदताना दिसते. ही शांतता कणाहीनांची. कणाहीनांच्या शांततेत समाधान नसते. ती असाहाय्यांची शांतता असते. सरकारदरबारी अनुदानासाठी वा पाच-दहा टक्क्यांतल्या घरांसाठी कटोरे घेऊन रांगेत उभे राहावयाची सवय झाली की हे असेच होते. मागे शिवसेना-भाजप सत्तेवर असताना कवी वसंत बापट यांनी एकदा काय ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सुनावले होते. पु.ल. देशपांडे, दुर्गाबाई भागवत हे अन्य काही अत्यंत सन्माननीय अपवाद. बाकी आपली कलावंत मंडळी सत्ताधीशांच्या पायांवर लोटांगणास तशी नेहमीच तत्पर. पूर्वी पेशवाईत कलावंतांचे रमणे भरत. त्यात पेशवे कलावंतांना त्यांच्या त्यांच्या मगदुराप्रमाणे दक्षिणा देत. नंतर आधुनिक महाराष्ट्रात शरद पवारांनी या रमण्याच्या प्रथेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. रोखीच्या रमणावाटपाचे तसे काही तितके जमले नाही. परंतु त्या बदल्यात कलावंतांना घरे, समित्यांवर वर्णी किंवा गेलाबाजार पद्म पुरस्कार वगैरे असे बरेच काही देण्याची प्रथा मात्र या राकट देशा, कणखर देशात रूढ झाली. ती पाहून प्रश्न असा पडतो की- कन्नड, मल्याळम, तेलुगु वा बंगाली अशा भाषांतील कलावंत विविध प्रश्नांवर आपापली भूमिका घेण्यास कचरत नसताना मऱ्हाटी कलावंतांच्याच मणक्यास असा लकवा कशाने भरला असावा?

याचे उत्तर शोधताना राजदरबारात कलावंतांनी सेवा रुजू करण्याच्या प्रथेपर्यंत मागे जावे लागेल. कवी, गायक, विदूषक अशा अनेकांचा प्रतिपाळ आपल्याकडे संस्थानिक आणि त्या आधी राजेरजवाडे यांच्याकडून केला जात असे. सम्राट अकबराचा नवरत्न दरबार तर विख्यातच आहे. परंतु असा अकबर आणि त्याचे नवरत्न हे अपवादच. अन्यत्र मात्र सर्रास या प्रथेचे विडंबनच झाले. नंतर नंतर तर आपल्याला राजगायकपद वा राजकवीपद मिळावे म्हणून या कलावंतांतच अहमहमिका सुरू झाली. पुढे स्वातंत्र्यानंतर राजेरजवाडे, संस्थानिक निकालात निघाले. परंतु तरी कलावंतांच्या रक्तात मुरलेली राजदरबाराच्या शाबासकीची सवय राहिली ती राहिलीच. एकदा का या शाबासकीची सवय लागली की पाठीच्या कण्यास बाक येतो आणि कोणत्याही प्रश्नावर सरळ उभे राहताच येत नाही. आताही सामाजिक बांधिलकी, पुरोगामी विचारधारा वगैरे शब्दप्रधान बोलघेवडे कलावंत वास्तविक आयुष्यात काही भूमिका घेतात असे दिसत नाही. दुसऱ्या वर्गाने प्रवास करून पहिल्या वर्गाचे भाडे सरकारकडून वसूल करण्यापुरतेच यांचे शौर्य. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ते एका मराठी चित्रपटास राष्ट्रीय महोत्सवाच्या उद्घाटनपटाचा मिळालेला मान नाकारला जाणे असे बरेच काही घडत असूनही आपली कलावंत मंडळी मूग गिळून राहण्यातच धन्यता मानतात हे अगदीच लाजिरवाणे. कलावंताने आपल्या प्रतिभेने काळास आकार द्यावयाचा असतो. कसे ते प्रकाश राज यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या कृतीने कलावंत आणि कवडे यांतील फरकदेखील स्पष्ट झाला आहे.


एकही प्रतिक्रिया नाही

Comments have been closed.

लोकसत्ता 'ब्लॉग बेंचर्स'वरील ब्लॉगवर तुमची प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत तुमची प्रतिक्रिया शेअर करून त्यांना ती वाचायला आणि लाईक करायला जरूर सांगा. 'लोकसत्ता'च्या परीक्षक मंडळाच्या निर्णयाव्यतिरिक्त तुमच्या प्रतिक्रियेला मिळालेल्या लाईक्सचाही स्पर्धेचा विजेता/विजेती निवडताना विचार केला जाईल.