महिलांना प्रवेशबंदीमागील अतार्किकता मान्य करण्याऐवजी पुरुषांनाही गाभाऱ्यात बंदी घालणे, म्हणजे सुधारणेचे एक पाऊल पुढे टाकण्याऐवजी दोन पावले मागे..
प्रागतिकता राहिली बाजूलाच. उलट पुरुषांप्रमाणे आम्हालाही दर्शन घ्यायचा हक्क हवा असे महिला वर्गास वाटत असेल तर ते दोघांतील बौद्धिक ऱ्हासाचेच दर्शन घडवते. अशा वातावरणात कोणाही उपटसुंभास आपले नेतृत्वगुण सिद्ध करण्याची संधी मिळते. या वेळीही ती दिसून आली.

हल्ली कोणीही कोणाचे काहीही ऐकायचेच नाही, असे ठरवलेले दिसते. नपेक्षा सध्या राज्याला ग्रासून राहिलेल्या मंदिरवादाची सांगड लावायची कशी? मंदिरप्रवेशाच्या प्रश्नावर वास्तविक उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर हा प्रश्न मिटणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. यामागील कारणही हेच. आमच्या धार्मिक अधिकारांत हस्तक्षेप करण्याचा अधिकार न्यायपालिकेस दिला कोणी, असा काही जणांना पडलेला प्रश्न असून देशाच्या अलीकडच्या इतिहासात या प्रश्नाची मुळे सापडतील. शाहबानो प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला वळसा घालण्यासाठी कै. राजीव गांधी यांनी कायदाच बदलण्याचा मार्ग काढला. त्यात त्यांना यश आलेही. परंतु त्याचा परिणाम असा की त्यानंतर प्रत्येक धर्मातील कर्मठांना चेव आला आणि अतिरेकी भूमिका घेतल्याखेरीज काहीच हाताला लागत नाही, असा संदेश त्यातून दिला गेला. त्यानंतरचे बाबरी मशीद प्रकरण, बाँबस्फोट, जातीय/ धार्मिक दंगली, गुजरात गोध्राकांड ते विद्यमान राजकीय स्थिती यातून धर्मवादाची कालबाहय़ कोळिष्टकेच तेवढी अधिक मजबूत झाली. महाराष्ट्रातील शनिशिंगणापूरचा वाद आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर देवस्थानाने घेतलेला निर्णय हे सर्व याच गोंधळलेल्या धार्मिक भूमिकेतून होत असून समाजातील विवेकाचा आवाज क्षीण झाल्याचे ते लक्षण आहे. तेव्हा या सर्वाचाच समाचार घेणे आवश्यक ठरते.

कोणी कशात देव मानावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. त्यामुळे शिंगणापूर चौकातील काळ्या दगडाचा सुळका हे शनीचे रूप आहे आणि शनी हा देव आहे असे ज्यांना वाटत असेल त्यांचे कोणीच काही करू शकत नाही. या चौथऱ्यावर महिलांना प्रवेशबंदी होती वा आहे. त्यामागे काहीही तार्किक कारण नाही आणि ते असूही शकत नाही. शनी जर देव आहे असे मानले तर देव हा पुरुष आणि स्त्रियांत भेद का करेल? आणि इतका मानवी पातळीवरील भेदभाव करणारा तो असेल तर मुदलात त्यास देव मानावेच का? हे प्रश्न विचारणे सध्याच्या काळात अगदीच औद्धत्याचे ठरावे. तरीही ते विचारणे आमचे कर्तव्य ठरते. याचे कारण या प्रश्नांना भिडण्याइतका किमान बौद्धिक प्रामाणिकपणा आपल्या समाजात नसेल तर पुढची सगळीच चर्चाच खुंटते. ती आता खुंटली त्यामागील एक कारण हे. आणि दुसरे म्हणजे अन्य धर्मीयांचा मुद्दा. साऱ्या सुधारणा हिंदू धर्मालाच का, असा एक अजागळ प्रश्न अलीकडे वारंवार विचारला जातो आणि त्याचे उत्तर देऊ पाहणाऱ्यांना अन्य धर्मातील अंधश्रद्धेस हात घालायची तुमची शामत नाही, असे सुनावले जाते. वाक्चातुर्य म्हणून हा मुद्दा एक वेळ योग्य मानता येईल. परंतु तो अगदीच सवंग ठरतो. याचे कारण अन्य धर्मात हिंदू धर्मीयांपेक्षा वाईट परिस्थिती आहे म्हणून हिंदू धर्मातील अपप्रवृत्तींवर घाला घालू नका, असे म्हणणे म्हणजे आधी इतरांच्या अंगणातील घाण काढा आणि मग माझ्या परसाला नावे ठेवा, असे म्हणण्यासारखे आहे. इतर धर्मात जास्त मागास आहेत म्हणून आमच्या मागासपणास आव्हान देऊ नका, असे म्हणण्यात कोणता शहाणपणा? आणि दुसरे असे की ज्याला काही धार्मिक सुधारणा करावयाच्या असतील त्याने प्रथम स्वधर्मात त्या घडवून आणल्याशिवाय अन्य धर्मीयांना हात घालण्याचा त्यास नतिक अधिकारच काय? तेव्हा हा युक्तिवाद कालबाहय़ ठरतो. अशा परिस्थितीत सरकारने त्या धर्मातील अधिकारी व्यक्तींना बोलवून मार्ग काढणे शहाणपणाचे ठरले असते. परंतु तो अधिकार सरकारकडे नाही. त्यात समाजात शहाण्या, आदरणीय विद्वानांची वानवा असल्याने या धर्ममरतडाना सुनावणारेही कोणी नाही. अशा परिस्थितीत जी अनागोंदी निर्माण होते, तीच आपल्याकडे सुरू आहे. वास्तविक मानवाची बौद्धिक क्षितिजे दिवसागणिक रुंदावत असताना मुदलात कोणाला शनी या ग्रहाऐवजी त्या नावाच्या देवात अधिक रस असेल तर तीच बाब हास्यास्पद ठरते. अशा वेळी महिलाच काय पण पुरुषांनीही अशा भेदभावकारक ठिकाणी डोके टेकवायची गरज नाही. ही प्रागतिकता राहिली बाजूलाच. उलट पुरुषांप्रमाणे आम्हालाही या शनीचे दर्शन घ्यायचा हक्क हवा असे महिला वर्गास वाटत असेल तर ते दोघांतील बौद्धिक ऱ्हासाचेच दर्शन घडवते. अशा वातावरणात कोणाही उपटसुंभास आपले नेतृत्वगुण सिद्ध करण्याची संधी मिळते. भूमाता ब्रिगेड वा तत्सम संघटनांच्या निमित्ताने ती दिसून आली. या संघटनेचे नाव सूचित करीत असल्याप्रमाणे तिच्या सदस्यांना भूमातेविषयी खरोखरच ममत्व असेल तर त्यांनी पाण्याअभावी कोरडय़ा पडून मरणासन्न झालेल्या मराठवाडय़ातील भूमातेच्या संवर्धनासाठी काही करावयास हवे. पण त्यात प्रसिद्धी नाही. त्यामुळे या मंडळींनी अन्य प्रसिद्धीलोलुपांप्रमाणे आंदोलनासाठी भलताच मुद्दा निवडला आणि तेवढीच आपली प्रसिद्धीची हौस भागवून घेतली. खरे तर कोणाही समंजस समाजात हा मुद्दा आंदोलनाचा नाहीच आणि न्यायालयीन लढाईत वेळ घालवावा इतका महत्त्वाचा तर नाहीच नाही. तरीही तो तितका महत्त्वाचा ठरवला गेला. यामागील एकमेव कारण म्हणजे अलीकडे सर्वानाच लोकप्रियतेची हौस वाटू लागली हे आहे. म्हणवून घेतात त्याप्रमाणे या आंदोलनकर्त्यां खरोखरच स्थिरबुद्धीच्या भूमाता असत्या तर त्यांनी शनी नामक ग्रहास देव मानून पुजणाऱ्या पुरुषांची निर्भर्त्सना करीत असल्या अजागळ प्रथांमागील मनोवृत्तीवर प्रहार केला असता. परंतु इतक्या बुद्धितेजाची अलीकडे अपेक्षाच करणे अनाठायी आहे. तेव्हा हा मुद्दा जणू काही जीवनमरणाचा आहे असा आभास निर्माण केला गेला आणि वातावरण तापवले गेले.

शनीनंतर त्र्यंबकेश्वर येथील शंकर मंदिर हे या आंदोलनकर्त्यांचे लक्ष्य होते, म्हणे. त्या मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश नाही, सबब तो मिळावा अशी मागणी आहे. शंकराच्या मंदिरात महिलांना प्रवेश का नाही, याचीही धर्मशास्त्र चिकित्सा व्हायला हवी. शनी मंदिराची जशी झाली नाही, तशीच ती याबाबतही झाली नाही. हिंदू धर्म इतिहासात शंकरानेही हनुमानाप्रमाणे ब्रह्मचर्य पाळल्याचा दाखला नाही. तो तर विवाहित होता. हिमालय कन्या पार्वती ही त्याची पत्नी. ज्या अर्थी वैवाहिक सुखाचे त्यास वावडे नव्हते आणि ज्या अर्थी एक स्त्रीच त्याची पत्नी होती त्या अर्थी स्त्रियांचे देहधर्म त्यालाही माहीत असणारच. तेव्हा ज्या कारणासाठी त्र्यंबकेश्वर येथील शंकर मंदिरात महिलांना प्रवेश नाकारला जातो त्या कारणांशी पती म्हणून शंकराचा परिचय असणारच. मग या मंदिरात महिलांना प्रवेश नाकारण्यात कोणता शहाणपणा? आणि कोणता धर्म? समजा वादासाठी शंकरास स्त्रीदर्शनाचे वावडे होते हे खरे मानले तर मग अन्य ज्योतिर्लिगांचे काय? या ज्योतिर्लिगांपैकी महत्त्वाचे मानले जाणाऱ्या काशी विश्वेश्वराच्या गाभाऱ्यात पिंडीपर्यंत महिलांना प्रवेश आणि त्र्यंबकेश्वरी नाही, हे कोणते धर्मशास्त्र? अशा परिस्थितीत आपली अताíककता मान्य करण्याचा प्रामाणिकपणा दाखवण्याऐवजी या मंदिराने निर्णय घेतला तो काय? तर पुरुषांनाही गाभाऱ्यात बंदी घालण्याचा. म्हणजे सुधारणेचे एक पाऊल पुढे टाकण्याऐवजी दोन पावले मागे जाणे. या मंदिराने तेच केले. या सगळ्याच घडामोडी बुद्धिप्रामाण्याचे प्रखर दर्शन घडवणाऱ्या महाराष्ट्रात व्हाव्यात हे अधिकच क्लेशदायी आणि दुर्दैवी ठरते. एकाने तरी शहाणे होण्याऐवजी हा महाराष्ट्र सर्वानीच वेडे होण्यात मोठेपणा मानू लागला असेल तर परिस्थिती निश्चितच काळजी वाटावी अशी आहे.

या पार्श्वभूमीवर समर्थ रामदासांच्या सल्ल्याने तरी या मंडळींच्या डोक्यात काही प्रकाश पडेल अशी आशा बाळगावी काय? रामदास हे मान्य करतात की, देव पहाया कारणे। देवळे लागती पहाणे. परंतु पुढे जाऊन हे स्पष्ट करतात की देवळे म्हणजे नाना शरीरे। जेथे राहिजे जीवेश्वरे॥ नाना शरीरे, नाना प्रकारे। अनंत भेटे॥
तेव्हा कथित भगवंताच्या दर्शनासाठी देवळात जाण्याचा दुराग्रह सोडणे हाच या वादांवरचा उपाय आहे, हे शहाण्यांनी तरी लक्षात घ्यावयास हवे.


एकही प्रतिक्रिया नाही

Comments have been closed.

लोकसत्ता 'ब्लॉग बेंचर्स'वरील ब्लॉगवर तुमची प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत तुमची प्रतिक्रिया शेअर करून त्यांना ती वाचायला आणि लाईक करायला जरूर सांगा. 'लोकसत्ता'च्या परीक्षक मंडळाच्या निर्णयाव्यतिरिक्त तुमच्या प्रतिक्रियेला मिळालेल्या लाईक्सचाही स्पर्धेचा विजेता/विजेती निवडताना विचार केला जाईल.