उच्च शिक्षण घेतल्याने परदेशात जाण्याची संधी असतानाही अनिल काकोडकर भारतातच राहिले ही तर त्यांची सर्वात मोठी चूक!!

या देशात जन्माला येऊन, राहात असूनही अजूनही लाज वाटून घेण्याची त्यांची संवेदना जिवंत आहे, हीच बाब मुदलात लाजिरवाणी. ही संवेदना कायमची मुळापासूनच खुडून टाकली तर जगणे बरेचसे सुसह्य़ होते, हे काकोडकर यांच्यासारख्यांनी लक्षात घ्यावयास हवे..

विख्यात अणुअभियंते अनिल काकोडकर यांचे साफ चुकले असे आमचे स्पष्ट मत आहे. काकोडकर मुंबईचे रहिवासी आहेत. या शहरातील भाभा अणू संशोधन केंद्रात सेवा करण्यात त्यांचे आयुष्य गेले. त्यांच्या चुकांची सुरुवात तेथूनच होते. अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेऊनही ते भारतात राहिले हीच सगळ्यात मोठी चूक. सुरुवातच चुकीची झाल्याने पुढे जे काही होणार तेही चूक असणार यात नवल ते काय. उच्च शिक्षणानंतरही ते केवळ प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून भाभा अणू केंद्रात राहिले. ध्रुव या अणुभट्टीचा आराखडा त्यांच्या कल्पनेतून बनला. तेव्हा त्या यशानंतरही त्यांनी देश सोडला नाही, म्हणजे चुकीची परिसीमाच की. ते जेथे काम करीत त्या मानखुर्द येथील भाभा अणू संशोधन केंद्राच्या सीमेलाच देवनार नावाचे प्रेक्षणीय स्थळ आहे, हे त्यांना माहीत नव्हते ही आणखी एक चूक. समाजवादी वातावरणात भारतीय जनतेस स्वप्ने विकणाऱ्या दिवंगत राज कपूर यांचा स्टुडिओ या देवनार येथे आहे आणि तेथूनच जवळ मुंबईची विख्यात कचरा क्षेपणभूमीदेखील आहे. ज्यांची स्वप्ने मुंबईत फळतात ते राज कपूर यांच्या स्टुडियोकडे वळतात आणि ज्यांच्या स्वप्नांचा चुराडा होतो ते आपले विखुरलेले स्वप्नावशेष शोधण्यासाठी कचराभूमीच्या आसऱ्यास येतात. आता हे काकोडकर यांना माहीत असावयास हवे. ते माहीत नसणे यास चूक नाही तर काय म्हणावे? आता राज कपूर यांच्या स्टुडिओपेक्षा कचराभूमी आकाराने मोठीच असणार आणि ती मोठीच होत राहणार हे समजणे अणू ऊर्जा समीकरणाइतके अवघड का आहे? जगात स्वप्नपूर्तीचा आनंद आणि समाधान भोगणाऱ्यांपेक्षा स्वप्नभंगाचे दु:ख सहन करणाऱ्यांची संख्या मोठीच असते. आणि असणार. तेव्हा राज कपूरच्या स्टुडिओपेक्षा कचराभूमी मोठीच असणार, यात नवल ते काय? हा कचऱ्याचा पर्वत आपण कमी करू शकलो नाही, त्या कचऱ्याची विल्हेवाट लावू शकलो नाही याची खंत काकोडकर यांच्या वैज्ञानिक हृदयास बोचत असून इतकी साधी समस्या आपण मिटवू शकत नाही त्यामुळे आपण मुंबईत राहात असल्याची लाज वाटते, असे काकोडकर म्हणाले. हे म्हणजे चुकांवर चुकाच करण्यासारखे. त्या काकोडकर यांच्यासारख्यांकडून होतात, याचे कारण भारत हा देशच विरोधाभासी आहे, ही बाब ते लक्षात घेत नाहीत, म्हणून. तेव्हा काकोडकर यांच्यासारख्यांच्या मनातील वेदना दूर करणे हे आमचे कर्तव्य असल्याने हा मुद्दा सविस्तर विशद करावा लागणे क्रमप्राप्त आहे.

पहिले म्हणजे या देशात जन्माला येऊन, राहात असूनही अजूनही लाज वाटून घेण्याची त्यांची संवेदना जिवंत आहे, हीच बाब मुदलात लाजिरवाणी. ही संवेदना कायमची मुळापासूनच खुडून टाकली तर जगणे बरेचसे सुसह्य़ होते, हे काकोडकर यांच्यासारख्यांनी लक्षात घ्यावयास हवे. योग्य वेळी आणि योग्य वयात हे न झाल्याने या सर्व समस्या उद्भवत आहेत. तेव्हा काकोडकर यांना आमचा प्रश्न हा की कशाकशाची लाज तुम्ही बाळगणार? काकोडकर विज्ञान क्षेत्राशी संबंधित. त्याच क्षेत्राच्या अध्र्वयूनी भारतीय बनावटीच्या प्रक्षेपकांचे तंत्रज्ञान विकसित केले. त्या प्रक्षेपकांच्या आधारे भारतीय अवकाशयान चंद्रावर जाईल आणि नंतर मंगळ या तामसी ग्रहालाही आपलेसे करेल. परंतु एकीकडे मंगळावर जाण्याचे तंत्रज्ञान विकसित होत असताना कोणत्या तरी दगडाला शनी मानून त्याच्या पूजेच्या हक्कासाठी डोकी फोडणारेही आपल्याकडे आहेत आणि त्या कथित शनीची पूजा केली म्हणून ते दक्षिण दिग्विजयाचा आनंदही साजरा करतात ही बाब लाज वाटावी अशी आहे की नाही? संपत्तीनिर्मितीला महत्त्व देऊ पाहणारे, जगात आपला विकासरथ किती सुसाट वेगाने जात आहे हे सांगण्यात धन्यता मानणारे सरकार असताना मुदलात गरीब कोणाला म्हणावे हेच आपल्याकडे ठरता ठरत नाही, हेदेखील लाजिरवाणे आहे की नाही? ज्या मुंबईतील कचऱ्याच्या डोंगराने डॉ. काकोडकर यांची मान शरमेने खाली गेली त्याच मुंबईतील ऑक्ट्रॉय नामक कराला पर्याय शोधण्यासाठी आतापर्यंत २३ समित्या नेमल्या गेल्या आणि तरीही मार्ग सापडलेला नाही, ही बाबदेखील लाजिरवाणे वाटावे अशी नाही काय? या मुंबापुरीत आठवडय़ात डझनाने माणसे केवळ रेल्वे रूळ ओलांडताना जिवास मुकतात, या वास्तवाचे काय करायचे? ४० हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या या शहरात ऐन मध्यवर्ती भागात महामार्गावर पेव्हर ब्लॉक्स नावाचा निर्बुद्ध प्रकार वापरून वाहनांसाठी रस्ता बनवला जातो. जागतिक कीर्तीचे महानगर म्हणवून घेण्यासाठी ही बाब अभिमानाने मिरवावी अशी आहे काय? एकविसाव्या शतकात या महानगरात अनेकांचा उदरनिर्वाह फक्त उंदीर पकडून होतो, ही बाबदेखील लाजिरवाणी नसू शकते काय? इतक्या मोठय़ा शहराला कचऱ्याचे काय करायचे हेच माहीत नसेल तर ते लाजिरवाणे आहेच. पण माहीत नाही म्हणून आपली घाण दुसऱ्याच्या अंगणात टाकण्यात त्याला कमीपणा वाटत नाही, हे अधिक लाजिरवाणे नव्हे काय? या महानगरावर दोन दशके सत्ता गाजवणाऱ्या राजकीय पक्षाचा अर्थविचार वडापावच्या टपऱ्यांपलीकडे जाऊच नये, यासही लाजिरवाणे म्हणता येईल. पण हे झाले शहराचे. हे शहर ज्यात आहे, त्या राज्याचे आणि देशाचे काय? सर्वात जास्त पाऊस पडूनही आणि सर्वाधिक धरणे असूनही महाराष्ट्रास दुष्काळास सामोरे जावे लागत असेल तर त्याचीही लाज वाटायलाच हवी. महाराष्ट्र हे श्रीमंत आणि प्रगत राज्यांत गणले जाते. परंतु पुणे आणि मुंबई वगळले तर हे राज्य ओरिसा आणि बिहार आदींपेक्षा काही भिन्न नाही, याची लाज वाटणे आवश्यक नाही काय? गडचिरोली आणि मुंबई या एकाच राज्यातील दोन टोकांत दरडोई उत्पन्नात तब्बल चारशे टक्क्यांची तफावत आढळावी आणि ती दिवसेंदिवस वाढतच जावी ही बाबदेखील काकोडकरांसारख्यांना निश्चितच लाजिरवाणी वाटेल यात शंका नाही. देशावर सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या पक्षाने नागरिकांकडे केवळ मतपेटी म्हणूनच पाहिले असेल तर तेदेखील लाजिरवाणे ठरेल का? कर्जाचे हजारभर रुपये बुडले तर त्याच्या वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या बँकांना नऊ हजार कोटींना चुना लावणाऱ्यास मात्र सरकार परागंदा होऊ देते, त्याचे काय? विकासाची भाषा करणाऱ्या सरकारातील काही गणंग मंत्री वाटेल ते बोलतात, धर्माच्या नावावर विभागणी करू पाहतात ही बाब अधिक लाजिरवाणी की मेक इन इंडिया करू पाहणारे पंतप्रधान या अशा गणगांना आवरत नाहीत, हे अधिक लाजिरवाणे याचा निर्णय करणे काकोडकर यांच्यासारख्या विचारी मनांनाही सहज शक्य होणार नाही. सरतेशेवटी आणखी एक मुद्दा. कळीचाच म्हणता येईल असा. वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ, विद्यापीठ अनुदान आयोग अशा शैक्षणिक क्षेत्रातल्या एकापेक्षा एक देदीप्यमान खात्यांचे नियंत्रण बारावी अनुत्तीर्ण पंडितांकडे देणे ही बाबदेखील मुंबईतील कचऱ्याच्या ढिगाइतकीच लाजिरवाणी आहे असे काकोडकर यांना वाटते काय? शेवटी हादेखील एक प्रकारचा कचराच की.

वैज्ञानिक असल्यामुळे काकोडकर यांना मराठी वाङ्मयाच्या परिशीलनाची किती संधी मिळाली हे ठाऊक नाही. परंतु आता त्यांनी त्यासाठी वेळ काढावा. गेला बाजार विंदा करंदीकर या द्रष्टय़ा कवीची ‘माझ्या मना बन दगड’ ही कविता मुखोद्गत करावी आणि विचार करणाऱ्या सर्वापुढे ती म्हणून दाखवावी.
नको पाहू जिणे भकास
ऐन रात्री होतील भास
छातीमधे अडेल श्वास
विसर यांना, दाब कढ
माझ्या मना बन दगड..
परिस्थितीचा विचार केल्याबद्दल आणि तो करून लाज वाटून घेतल्याबद्दल काकोडकर यांना हीच शिक्षा.


एकही प्रतिक्रिया नाही

Comments have been closed.

लोकसत्ता 'ब्लॉग बेंचर्स'वरील ब्लॉगवर तुमची प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत तुमची प्रतिक्रिया शेअर करून त्यांना ती वाचायला आणि लाईक करायला जरूर सांगा. 'लोकसत्ता'च्या परीक्षक मंडळाच्या निर्णयाव्यतिरिक्त तुमच्या प्रतिक्रियेला मिळालेल्या लाईक्सचाही स्पर्धेचा विजेता/विजेती निवडताना विचार केला जाईल.