टिनपाट पुढारी असो, राष्ट्रीय नेता असो की उद्योगपती.. कायदा मोडणे हे पुरुषार्थाचे लक्षण मानले जाते.

स्वत:शिवाय प्रत्येकाचे स्वातंत्र्य जपण्याची जबाबदारीही आपल्यावरच येते, याचे भान सुटू लागले की कायदेभंगात शौर्य मानणाऱ्या शक्ती डोके वर काढू लागतात. त्यांना वेगवेगळ्या स्तरांतून पाठबळ मिळते आणि त्यातून बलात्कार, अत्याचार करणाऱ्यांनाही ताकद मिळू लागते. ही ताकद कधी जातिवास्तवातून, कधी अहंकारातून तर कधी सत्तेच्या माजातून येते.

कोपर्डीतील बलात्कारानंतर एक प्रश्न समाजातील अभिजन एकमेकांना विचारतील आणि त्याचे उत्तर होकारार्थी देत स्वत:कडे निदरेषत्व घेत समाधानाचा नि:श्वास सोडतील. तो प्रश्न म्हणजे अलीकडच्या काळात लिंगपिसाटांची संख्या वाढली काय? याचे उत्तर वरकरणी होय असे देणे शक्य असले तरी तसे करणे योग्य नाही. याचे कारण या प्रश्नाआधी हल्ली वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची संख्या वाढली काय, जागा बळकावणाऱ्या बिल्डरांचे प्रमाण वाढले काय, एखाद्या शिक्षणक्रमात गुणवत्तेवर प्रवेश मिळत नसेल तर काळ्या धंद्यांतून मिळालेला पैसा फेकून तो प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली काय हे आणि असे अनेक प्रश्न विचारावे लागतील. याचे कारण या प्रश्नांच्या उत्तरात आपले सामाजिक वास्तव दडलेले आहे. जी गोष्ट नियमाने मिळत नाही ती नियमास बगल देऊन आणि प्रसंगी नियम मोडून मिळवता येते, नव्हे ती तशीच मिळवायची असते याचे असंख्य दाखले समाजात उभे राहात असून बलात्कार आदी गुन्ह्यांमागे ही मानसिकता आहे हे आपण आधी लक्षात घ्यावयास हवे.

अहमदनगर जिल्ह्यच्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील बलात्काराच्या या घटनेने माणूस म्हणवून घेण्यास आपल्याला लाज वाटावयास हवी. गेल्या चार वर्षांत याच जिल्ह्यत घडलेली ही चौथी घटना. त्यापैकी दोन घटनांमध्ये अद्यापही न्यायालयात खटला सुरू आहे. एका घटनेतील खटला जलदगती न्यायालयात सुरू असून अंतिम टप्प्यात आहे. इतक्या निर्घृणपणे एखाद्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्याएवढे धैर्य असणाऱ्या युवकांना अशी कृत्ये करताना होणाऱ्या परिणामांची जाणीव कशी नसते? दिल्लीतील १६ डिसेंबर २०१२ रोजी घडलेल्या प्रकरणापेक्षाही अधिक किळसवाण्या पद्धतीने ही घटना घडली असून, खरे तर त्याचा समाजातील सर्वच स्तरांतून तीव्र निषेध व्हावयास हवा. आजोबांना डबा द्यायला गेलेल्या या युवतीवर वाटेत अडवून पाशवी अत्याचार करणाऱ्या या तरुणांच्या गुन्हेगारी प्रवृत्तींची माहिती आता उजेडात येत आहे. या घटनेतील एका आरोपीने वर्षभरापूर्वी त्याच गावात एकाचा खून केला होता. त्यातील एकावर एका महिलेच्या विनयभंगाचाही आरोप आहे. मात्र त्यावेळी संबंधित कुटुंबीयांनी केवळ भीतीपोटी पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती. कोपर्डीतील घटना उजेडात आल्यानंतर त्या कुटुंबाने ही माहिती उघड केली. तक्रार दिल्याने घरातील आणखी कोणाचा बळी जाऊ नये, अशी दहशत जर तिथे असेल, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य आहे, असे कसे म्हणता येईल? चार वर्षांपूर्वी सोनई येथे, दोन वर्षांपूर्वी खर्डा येथे आणि वर्षभरापूर्वी जवखेडे येथे अशाच अमानुष अत्याचाराच्या घटना घडल्या. त्याहीवेळी समाजातून मोठय़ा प्रमाणात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. प्रत्यक्षात नंतर काहीच घडले नाही. पुढील घटना घडेपर्यंत समाज असा निर्ढावलेला राहतो आणि आपल्या संवेदना हरवून बसतो, असा आजवरचा अनुभव आहे.

बलात्कार आणि खून ही घटना हीनपणाची पातळी गाठणारी असते. कोणाही व्यक्तीला तिचे स्वत्व हिरावून घेण्याने होणाऱ्या वेदनांपेक्षाही अशा घटना अधिक तीव्र परिणाम करणाऱ्या ठरतात. ज्या महाराष्ट्रात मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त करणारी चळवळ सुरू होते आणि त्याचा देशभर प्रसार होतो, त्याच महाराष्ट्रात स्त्रियांना घराबाहेर पडण्यास भीती वाटावी, अशा घटना सातत्याने घडत असतील, तर ते काळाच्या मागे जाण्यासारखेच आहे. प्रगत म्हणून घ्यायचे, तर समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा हक्क न्याय्य पद्धतीने मिळण्याची व्यवस्था निर्माण व्हावयास हवी, त्यामध्ये असे हक्क कोणी कोणास देऊन उपकार केल्याची भावनाही असता कामा नये. ज्या व्यवस्थेत प्रत्येकाला स्वत:चे स्वातंत्र्य जपायचे असते, तेथे स्वत:शिवाय प्रत्येकाचे स्वातंत्र्य जपण्याची जबाबदारीही आपल्यावरच येते, हे भान सुटू लागले की अशा शक्ती डोके वर काढू लागतात. त्यांना वेगवेगळ्या स्तरांतून पाठबळ मिळते आणि त्यातून अशी घाणेरडी कृत्ये करणाऱ्यांनाही ताकद मिळू लागते.

ही ताकद कधी जातिवास्तवातून, कधी अहंकारातून तर कधी सत्तेच्या माजातून येते. पुरुषपणाच्या भावनेवर अशा गोष्टींमुळे फुंकर घातली जाते. महिलेशी असे वागणे, हीच जणू आपली ताकद आहे, अशा कल्पनांनाही थारा मिळतो. हे सारे अशा घटनांनंतर उमटणाऱ्या प्रतिक्रियांवरून अगदी सहजपणे समोर येते. कोपर्डीतील घटना काय, किंवा यापूर्वी घडलेल्या कोणत्याही अशा घटना काय, चीड, संताप, राग कोणी, किती आणि कसा व्यक्त करायचा, याचे काही आडाखे तयार होणे, हे किमान मानवी संवेदनशीलताही आपण हरवत चालल्याचे लक्षण आहे. गुन्हा काय ते पाहायचे नाही. पण आरोपी कोणत्या धर्माचा, जातीचा, आपल्यापैकी तर नाही अशा निलाजऱ्या प्रश्नांची उत्तरे आधी शोधायची आणि मग जमेल तितका निषेध करायचा ही आजची पद्धत. बलात्कार आणि त्यानंतर हत्या ही घटना कोणाही माणसास अस्वस्थ करणारीच असायला हवी. बलात्कारासारखी शरम वाटणारी घटना कोणत्या समूहातील व्यक्तीच्या संदर्भात आहे, त्यावर प्रतिक्रिया कशी व्यक्त करायची याचा विचार करणे हे मागासलेपणाचे म्हटले पाहिजे. कोपर्डीच्या घटनेनंतर हे पुन्हा एकदा समोर आले आहे. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी किंवा आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी, अशा घटनांचा वापर करणे, हे त्याहून अधमपणाचे आहे. अशावेळी आपल्या जागृत मनाचा कौल महत्त्वाचा असतो. मात्र त्याकडे खुलेपणाने पाहण्याची तयारी असावी लागते. गेल्या काही वर्षांत निर्माण झालेल्या सामाजिक निबरपणातून हा खुलेपणाही संपला आहे. आरोपींवर कठोर कारवाई केल्याने पुढील घटना टळतील, हे खरे असले, तरी तेवढेच पुरेसे नाही, हे लक्षात घेण्यास आजही कुणी तयार नाही. प्रत्येकाने प्रयत्न करायचे ते केवळ आपापले हितसंबंध जपण्यासाठीच असे आजचे वातावरण. ते तयार झाले कारण विचार करण्याची आणि प्रश्नांना निकोपपणे, पक्षीय, जातीय हितसंबंधांना बाजूस ठेवून भिडण्याची मानसिकता समाजातून हरवू लागली आहे. हे सार्वत्रिक आहे. त्यामुळे जळगावातील अत्याचारित चिमुरडीला घराबाहेर बोलावून तिच्याशी जाहीर संवाद साधण्याएवढी असंवेदनशीलता महिला आयोगाचे सदस्य दाखवू शकतात आणि राजस्थानातील जयपूर शहरात पोलीस स्थानकात जाऊन बलात्कारित महिलेबरोबर ‘सेल्फी’ काढण्याएवढा कोडगेपणाही त्यामुळेच अंगी बाणतो. यातूनच कोपर्डीप्रकरणातील आरोपीचा कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्याशी जवळचा संबंध आहे, हे दाखवण्यासाठी त्यांची छायाचित्रे समाजमाध्यमांमध्ये प्रसारित करतानाही आपण काही चुकीचे करीत आहोत, याचे अनेकांकडून भान सुटले. इतके की आपले सहकारी मंत्री आणि आरोपींचे काहीही मैत्र नाही हे दाखवण्याच्या उत्साहात सरकारकडून खऱ्या आरोपींची छायाचित्रे प्रसृत केली जाण्याचा अगोचरपणा घडला.

हे असे आपल्याकडे वारंवार होते याचे कारण आपल्यासारख्या व्यवस्थाशून्य समाजात कायदा मोडणे हे पुरुषार्थाचे लक्षण मानले जाते. मग तो गावातला टिनपाट पुढारी असो, राष्ट्रीय नेता असो की उद्योगपती. जेवढा मोठा कायदेभंग तेवढी मोठेपणाची प्रभावळ मोठी. खंत ही की अशा व्यवस्थाशून्य समाजात या कायदेतोडय़ांना समाजही नायकत्व देतो. परिणामी नियमाने चालणारे हे नामर्द ठरू लागतात आणि मिळेल ते ओरबाडून घेणे हे न्याय्य मानले जाते. तेव्हा अशा समाजात बलात्कारी वृत्ती वृद्धिंगत होत नसेल तरच नवल. त्यामुळे कोपर्डीत गर्हणीय गुन्हा करणारे जेवढे त्यास जबाबदार आहेत तेवढाच अशा गुन्हेगारांना जोपासणारा समाजही जबाबदार आहे. कारण या समाजपुरुषाचे पौरुष सडलेले आहे. परिणामी अशा बेबंद समाजास पौरुषत्वाची व्याख्या नव्याने समजावून सांगावी लागणार आहे. नियमाने चालत आपला उत्कर्ष साधणे म्हणजेच खरे पौरुष हे या समाजात नव्याने बिंबवावे लागेल.


एकही प्रतिक्रिया नाही

Comments have been closed.

लोकसत्ता 'ब्लॉग बेंचर्स'वरील ब्लॉगवर तुमची प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत तुमची प्रतिक्रिया शेअर करून त्यांना ती वाचायला आणि लाईक करायला जरूर सांगा. 'लोकसत्ता'च्या परीक्षक मंडळाच्या निर्णयाव्यतिरिक्त तुमच्या प्रतिक्रियेला मिळालेल्या लाईक्सचाही स्पर्धेचा विजेता/विजेती निवडताना विचार केला जाईल.