कागदावरचे कोणतेही कायदे झपाटय़ाने विकसित होणाऱ्या मानवताशून्यतेला वेसण घालू शकत नाहीत, हेच आता वारंवार स्पष्ट होत आहे..
या विश्वातील किडेमुंग्या, पशुपक्षी, रानेवने आणि झाडाझुडपांच्या जगड्व्याळ पसाऱ्यात जगणाऱ्यांपेक्षा काहीसा अधिक सतर्क मेंदू आणि दोन हात व दोन पाय असे थोडेसे वेगळेपण आपल्याला लाभले म्हणून आपण आपणास इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत असू, तर ते किती कचकडीपणाचे आहे याची जाणीव निसर्गाने याआधी वेळोवेळी करून दिलेली असतानाही आपणास शहाणपण येत नाही, ही माणूस म्हणून आपल्याला असलेल्या वेगळेपणाला व अतिरिक्त अक्कलहुशारीला काळिमा फासणारी गोष्ट आहे. पण हे आपणास माहीत असूनही आपल्या वागण्यात बदल होणार नसेल, तर आपण माणूस या उपाधीला किती पात्र ठरतो, याचा विचार करण्याची आपली क्षमताही केव्हाच संपली आहे असेच मानावे लागेल. असे असतानाही, माणूसपणाच्या संकल्पनांची आपण जेव्हा सर्रास पायमल्ली करतो आणि निसर्गाचे नियमही बेशरमपणे धुडकावून लावत आपल्या श्रेष्ठत्वाचा गैरफायदा घेतो, तेव्हा आपल्यातीलच काही जण अशा आपल्या वागण्यास पशूची उपमा देऊन मोकळे होतात, हा विरोधाभास त्याहूनही लज्जास्पद आहे. पशूंच्या जगण्यात निसर्गाचे सामान्य नियम प्रामाणिकपणे पाळले जातात, हे आपणच केलेल्या असंख्य अभ्यासांतून आणि संशोधनांतून वारंवार सिद्ध झालेले असल्याने, माणूस या द्विपाद पशूपेक्षाही चतुष्पाद प्राणी, पक्षी, किंवा झाडेझुडपेदेखील अधिक सुसंस्कृत आहेत, हेही स्पष्ट झालेले आहे. तरीदेखील, माणसाने आपल्याभोवती आखलेल्या आणि खरे तर, स्वार्थीपणा जपणाऱ्या कुंपणांच्या पलीकडची कृती केली तरीही त्याला पशूची उपमा का दिली जाते, हे एक कोडेच आहे. पण त्याचे उत्तर आता सापडू लागले आहे. अनेक वर्षांपूर्वी, किंवा अजूनही कधी कधी, अशा कृतीचे वर्णन, ‘माणुसकीलाही लाजवील अशी कृती’ अशा शब्दांत केले जायचे. पण आता ‘माणुसकी’ नावाच्या त्या अदृश्य प्रकाराचे अस्तित्वच अंधूक होऊ लागले असल्याने आणि लाज वाटावी असे कोणतेच संकेतही जिवंत नसल्यासारखी परिस्थिती झपाटय़ाने फैलावू लागल्याने, माणुसकीला काळिमा, माणुसकीची लक्तरे, माणुसकीला लाज हे शब्ददेखील जुन्या शब्दकोशात गुरफटून घुसमटू लागले असावेत. माणुसकी या शब्दाचे अर्थ असे संकुचित होऊ लागले असतानादेखील क्रौर्याची किंवा अमानुषपणाची परिसीमा वर्णन करण्यासाठी त्या कृतीला पशुत्वाची उपमा देणे हा निसर्गनियम प्रामाणिकपणे पाळणाऱ्या व कोणत्याही स्थितीत त्यांचे उल्लंघन न करता ‘जगणाऱ्या व जगू देणाऱ्या’ मानवेतर जीवसृष्टीवर घोर अन्याय आहे. पण हे आपल्याला माहीत असले, तरी आपण निसर्गत: अन्य प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आणि शक्तिमान असल्याने, आपण ठरवू तीच उपमा आणि आपण देऊ तोच शब्द हे असेच यापुढेही चालत राहणार आहे.

कारण, माणुसकी या शब्दाची सीमा आपण दिवसेंदिवस स्वत:च संकुचित करत आहोत. आपली माणुसकी आपल्यापुरती मर्यादित ठेवण्यासाठी आपली सारी बौद्धिक कौशल्ये पणाला लावण्याची स्पर्धा आपणच सुरू केलेली आहे आणि आपण त्या स्पर्धेचे एक स्पर्धक आहोत. याची प्रत्यक्ष जाणीव आपल्याला असो अथवा नसो, पण या स्पर्धेत आपण मागे पडू नये किंवा अन्य कोणीही आपल्यावर कुरघोडी करू नये यासाठी या स्पर्धेत भाग घेणे आपल्याला भाग पडले आहे. अशा या, ‘लिमिटेड माणुसकी’ जपण्याच्या स्पर्धेसाठी मात्र, आपण आपले असे काही नियम घालून घेतलेले असल्याने त्याचे परिणाम ज्यांना भोगावे लागतात, त्यामध्ये मानवेतर जीवसृष्टीचा मोठा वर्ग नेहमीच भरडला जाऊ लागला आहे आणि ‘लिमिटेड माणुसकी’मुळे आजकाल आपल्याला त्यांच्या या भरडून निघण्याची लाज किंवा तसे काहीही वाटावे अशी परिस्थिती आपण केव्हाच मागे टाकून दिलेली आहे. म्हणूनच आता, या जमिनीच्या तुकडय़ावर जगण्याचा हक्क माणसाखेरीज कुणालाच नाही असा बेमुर्वत विचार आम्हा द्विपाद पशूंमध्ये दिवसागणिक बळावत चाललेला दिसू लागला असून त्याची प्रात्यक्षिकेही आपण जागोजागी सुरू केल्याचे अनुभवास येऊ लागले आहे. या भयाण वास्तवाची दाहक जाणीव झालेला व मन नावाचा एक अवयव जिवंत असलेला लहानसा वर्ग या वास्तवाच्या परिणामांच्या भयाने कधी कधी आक्रोश करतो, त्याविरुद्ध दुबळा लढा देण्याचाही प्रयत्न करतो, पण या लढय़ाची ताकदही तेवढीच तोकडी असते. अखेर त्या लढय़ाला हार पत्करावी लागते आणि ‘स्वयमेव जगण्याच्या’ हक्काच्या हट्टापुढे असे लढे हार पत्करून माघार घेतात.
हे आता रोजचेच झाले आहे. जंगलांवर अतिक्रमणे करून तेथे जगणाऱ्या मानवेतर सृष्टीला हुसकावण्यास कधीचीच सुरुवात झाली आहे. वन्य पशूंनाही जीव मुठीत धरून जगण्याची वेळ आलीच आहे, पण, माणसाच्या भरवशावर आणि माणसाच्या अंगी कधी काळी असलेल्या माणुसकीच्या विश्वासावर निर्भर राहून माणसाच्या आसपास वावरणाऱ्या प्राण्यांनाही आता जगणे बेभरवशाचे वाटू लागणार आहे. हे कधी तरी घडणार याच भयापोटीच, मन असलेल्या माणसांतील काहींनी माणसांवर बंधने आणण्यासाठी मोठय़ा प्रयासाने काही नियम निर्माण केले. कारण, माणूस अनिर्बंध होणार हे जेव्हा लक्षात येऊ लागले, तेव्हा कायदे आणि नियम तयार करणे ही एक अपरिहार्यताच होती. त्याचाच भाग म्हणून, माणसाने मानवेतर सजीवांशी कसे वागावे यासाठी अखेर कायदे करण्याची वेळ आली. या कायद्यांनी प्राण्यांना हक्क बहाल केले आणि प्राण्यांविषयी माणसांच्या कर्तव्याच्या चौकटीदेखील निश्चित केल्या. पण कायद्यातून पळवाटा शोधण्याची कला आपल्याकडे पहिल्यापासूनच विकसित असल्याने आणि कायद्याआधी पळवाटा शोधल्या जात असल्याने, कागदावरचे कोणतेही कायदे झपाटय़ाने विकसित होणाऱ्या मानवताशून्यतेला वेसण घालू शकत नाहीत, हेच वारंवार स्पष्ट होत गेले.

कोणत्याही सजीवाला या भूतलावर जगण्याचा माणसाएवढाच मूलभूत हक्क आहे, हे या कायद्याचे मूलतत्त्व आहे. भारतीय दंडसंहितेनुसार, कोणत्याही जिवंत प्राण्याची हत्या करणे हा शिक्षापात्र गुन्हा आहे आणि कोणत्याही जिवंत प्राण्यास बेदखल करून त्याचे जगणे असह्य़ करून सोडणाऱ्यास तुरुंगवासाची तरतूदही या कायद्यात आहे. कोणत्याही प्राण्यास अन्नपाण्याविना तडफडून मरणासन्न अवस्थेत सोडून देणे हे अक्षम्य दुर्लक्ष मानले जाऊन त्यासाठीही या कायद्यात शिक्षेची तरतूद आहे आणि मनोरंजनाकरिता प्राण्यांना वेठीस धरणेदेखील या कायद्याने गैर ठरविले आहे. मुळात प्राण्यांनाही जगण्यासाठी माणसाएवढेच हक्क कायद्यानेच बहाल केलेले असतानाही, वास्तवात मात्र प्राण्यांना जगण्याचा हक्क नसल्यासारखी वागणूक देण्याचा अमानवी प्रकारच सर्वत्र वाढीला लागलेला दिसतो. माणसाच्या सान्निध्यात वावरणाऱ्या प्राण्यांच्या उपद्रवाची आणि त्यांच्या जगण्याच्या हक्कावर मर्यादा आणण्याची चर्चा गंभीरपणे सुरू झाल्याने, या प्राण्यांच्या भविष्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहू पाहात आहे. भटकी कुत्री हा समाजाच्या तिटकाऱ्याचा विषय आहे. या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे हा तिटकारा वाढत असला तरी या प्राण्यांचा जगण्याचा हक्क नाकारण्याचा अधिकार माणसाने स्वत:कडे का घ्यावा हे कोडे आता अधिक गडद होऊ लागले आहे. आपल्या प्राणिप्रेमाच्या संकल्पनादेखील अलीकडे सापेक्ष होऊ लागल्या आहेत. गाय या पशूविषयी आपल्या मनात अपार श्रद्धायुक्त प्रेमाचे झरे अखंडपणे वाहू लागलेले असताना, माणसाच्या विश्वासावर त्याच्या सान्निध्यात राहणाऱ्या कुत्र्या-मांजरांना आणि किडय़ामुंग्यांना मात्र ठार मारण्याचा अमानुषपणाही दुसरीकडे पाहावयास मिळतो.

परवा पुण्यात चार कुत्र्यांना जमावाने जिवंत जाळले आणि सोळा कुत्र्यांना अन्नातून विष घालून ठार मारले. माणसाने समोर ठेवलेले अन्न विश्वासाने त्या कुत्र्यांनी घशाखाली घातले असेल, तेव्हा ज्यांच्या सावलीत आपण जगतो आहोत त्यांच्याकडून आपले अस्तित्व असे पुसले जाईल असा विचारदेखील त्या मुक्या जनावरांना शिवला नसेल. जिवंतपणी अंगावर ज्वाळा झेलत मरणाला कवटाळणाऱ्या त्या चार कुत्र्यांना अखेरचा श्वास सोडताना माणसाविषयी काय वाटले असेल या विचाराने अस्वस्थ होण्याची आपली संवेदनशीलता संपलीच असेल, तर या भूतलावर जगण्याचा हक्क माणसाखेरीज कुणालाच उरणार नाही, हेच खरे मानावयास हवे.. जगण्याच्या हक्काचे कागदावरचे कायदे कायमचे पुसून टाकण्याची हीच वेळ आहे, यात शंका नाही!


एकही प्रतिक्रिया नाही

Comments have been closed.

लोकसत्ता 'ब्लॉग बेंचर्स'वरील ब्लॉगवर तुमची प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत तुमची प्रतिक्रिया शेअर करून त्यांना ती वाचायला आणि लाईक करायला जरूर सांगा. 'लोकसत्ता'च्या परीक्षक मंडळाच्या निर्णयाव्यतिरिक्त तुमच्या प्रतिक्रियेला मिळालेल्या लाईक्सचाही स्पर्धेचा विजेता/विजेती निवडताना विचार केला जाईल.