सीरियात पहिल्यांदा दहशतवादाची ठिणगी पडली तेव्हापासून असाद यांना आवरण्याचा प्रयत्न झाला, तो रशियानेच हाणून पाडला..

सीरियाविरोधातील ठरावप्रसंगी सुरक्षा परिषदेतील पाच देशांपैकी रशियाने आपला नकाराधिकार वापरला आणि चीन तटस्थ राहिला.कमालीचा थंडपणा, विधिनिषेधशून्य राजकारण आणि प्रशासनाचा गळा घोटण्याची ताकद ही पुतिन यांची वैशिष्टय़े येथेही दिसली.

राजकारण जागतिक असो वा स्थानिक. ते करणाऱ्यांनी माणुसकीच्या काही किमान नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा करणे गैर नाही. परंतु जागतिक असो वा स्थानिक. राजकारणाच्या दोन्हीही पातळ्यांवर ही साधी अपेक्षादेखील अलीकडे सर्रास पायदळी तुडवली जाताना दिसते. रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा सभेत सीरियाविरोधातील निर्भर्त्सना ठराव हाणून पाडण्यासाठी आपला नकाराधिकार वापरला हे या आंतरराष्ट्रीय अपेक्षाभंगाचे ताजे उदाहरण. गत सप्ताहात सीरियाचे सर्वेसर्वा असाद यांनी आपल्याच नागरिकांविरोधात अत्यंत हिंस्र, अमानुष अशी रसायनास्त्रे वापरली. या रसायनास्त्रांची कोणतीही चाहूल लागत नाही आणि असह्य़ यातना सुरू झाल्यावरच संबंधितांना आपल्याविरोधात अशा रसायनास्त्रांचा प्रयोग झाल्याची जाणीव होते. म्हणजे अन्य बाँब आदी अस्त्रांप्रमाणे रसायनास्त्रांपासून स्वत:ला वाचवण्याची संधीच अभागी नागरिकांना मिळत नाही. यातील काही रसायनास्त्रांच्या संसर्गाने बाधितांना डोळ्यात हजारो सुया टोचल्यागत वेदना होतात तर काही अस्त्रांमुळे त्वचा जळू लागते. या रसायनास्त्रांचा इतिहास आणि वर्तमान अमानुष आहे. तो पाहता जगातील सर्व रसायनास्त्रे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. पण त्याचे यश कागदोपत्रीच राहिले. अनेक देशांतील बदमाष सत्ताधीशांनी स्वत:कडे ही अस्त्रे ठेवली वा ती बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित करून ठेवले. वेळोवेळी त्यांचा वापर होत असतो. सीरियातील असाद यांच्या फौजांनी केलेला त्यांचा वापर हे ताजे उदाहरण. या अस्त्रांच्या संपर्कामुळे सीरियातील अनेक अभागी बालके अक्षरश: होरपळून गेली. असह्य़ वेदनांमुळे गडाबडा लोळणाऱ्या या बालकांची दृश्ये पाहून कोणाही किमान हृदयी.. सहृदय नसले तरी.. व्यक्तीच्या मनात कणवच दाटून येईल आणि ती वापरणाऱ्याविरोधात संताप.

रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची गणना अशा किमान हृदयी व्यक्तींतदेखील करता येणार नाही. असे मानण्यास जागा आहे कारण पुतिन यांच्या रशियाने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा सभेस सीरियाच्या असाद यांचा धिक्कार करणारा ठराव मंजूर करण्यापासून पुन्हा एकदा रोखले. सुरक्षा परिषदेच्या पाच कायम सदस्यांना नकाराधिकार आहे. फ्रान्स, अमेरिका, ग्रेट ब्रिटन, रशिया आणि चीन हे ते पाच देश. त्यामुळे या पाचही सदस्यांनी अनुमोदन दिल्याखेरीज कोणताही ठराव मंजूर होऊ शकत नाही. सीरियाविरोधातील ठरावप्रसंगी या पाचातील रशियाने आपला हा नकाराधिकार वापरला आणि चीन तटस्थ राहिला. रशियाने अतिरेकी असाद यांची तळी उचलण्याची ही काही पहिलीच खेप नव्हे. आतापर्यंत एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल आठ वेळा आपला नकाराधिकार वापरून रशियाने सीरियास वाचवले आहे. २०११, २०१२ साली दोन वेळा, २०१४, २०१६ साली दोनदा आणि आताचा ताजा २०१७ सालचा. असा हा इतिहास आहे. त्यावरून दिसते ते हेच की २०११ साली सीरियात पहिल्यांदा जेव्हा दहशतवादाची ठिणगी पडली तेव्हापासून सातत्याने असाद यांना आवरण्याचा प्रयत्न झाला आणि तितक्याच सातत्याने तो रशियाने हाणून पाडला. या साऱ्या प्रयत्नांत रशियाला चीनने साथच दिली. याआधी हफिझ सईद या कुख्यात दहशतवाद्याविरोधातील ठरावावर नकाराधिकार वापरून चीनने आपण कोणत्या टोकास जाऊ शकतो, हे दाखवून दिलेच होते. दांडगाई करून काबीज केलेल्या पॅलेस्टिनी भूमीच्या कृत्यासाठी इस्रायलविरोधात निंदाव्यंजक ठराव आला असता अमेरिकेने आपला नकाराधिकार वापरून तो रोखला. त्यातल्या त्यात फ्रान्सनेच नकाराधिकारांचा कमीत कमी वापर केला आहे. याचा अर्थ हा अधिकार असलेल्या सर्वानीच या नकाराधिकाराचा वापर आपापल्या हितसंबंध रक्षणासाठीच केला. आणि एकदा का केवळ स्वत:चे हितसंबंध रक्षण हेच प्राधान्य असेल तर विवेकाकडे दुर्लक्ष होते. जागतिक राजकारणात बलाढय़ वा महासत्ता समजल्या जाणाऱ्या अनेक देशांनी हेच उद्योग केले. परंतु तरीही पुतिन यांची ही कृती अत्यंत घृणास्पद आणि असमर्थनीय ठरते. याचे कारण या पाच देशांतील दोनच देश असे आहेत की जेथे लोकशाही नाही. हे देश म्हणजे चीन आणि रशिया. यापैकी रशियात लोकशाही आहे, असा प्रति युक्तिवाद केला जाईल. पण तो निर्थक आहे. कारण रशियातील लोकशाहीचे वर्णन फार फार तर कुडमुडी लोकशाही असे करता येईल. याचे कारण एकविसाव्या शतकाच्या मुहूर्तास सत्तेवर आलेल्या पुतिन यांनी सभ्यतेचे सर्व निकष पायदळी तुडवले असून त्यांची राजवट म्हणजे लोकशाहीच्या आभासामागची हुकूमशाहीच आहे. चीनचेही तेच. तेव्हा सोमालिया असो वा सीरिया. तेथील मानवताविरोधी राजवटींना वाचवण्याचे पुण्यकर्म रशिया आणि चीन सातत्याने करीत आहेत. यातील चीनकडून कोणालाच काही आशा नाही. इतका तो देश हुकूमशाही आणि निर्घृण राजवट असलेला आहे. तेव्हा राहता राहिला रशिया.
परंतु पुतिन यांच्या कार्यकाळात रशियाने अत्यंत मागास असे वळण घेतले असून त्यात काही बदल होण्याची लक्षणे नाहीत. कमालीचा थंडपणा, विधिनिषेधशून्य राजकारण आणि प्रशासनाचा गळा घोटण्याची ताकद ही पुतिन यांची वैशिष्टय़े. सत्तेवर आल्यापासून आपल्या एकेक विरोधकास जगातूनच संपवण्याचा उद्योग त्यांच्याकडून सातत्याने सुरू आहे. मग ती व्यक्ती पुतिन सत्तेवर यावेत यासाठी प्रयत्न करणारी बेरेझोव्हस्की यांच्यासारखा उद्योगपती असो वा रशियन तेलसाम्राज्याचा प्रमुख खादरेव्हस्की असो किंवा अ‍ॅना पोलित्कोवस्कायासारखी पत्रकार. अशा अनेकांचा कायमचा काटा काढण्यास पुतिन कचरले नाहीत. ही त्यांची विरोधक नायनाट मोहीम आजतागायत सुरू असून त्यांचे विरोधक कसे अचानक गायब होतात याचा अनुभव रशियनांनी अनेकदा घेतलेला आहे. अर्थात तरीही पुतिन यांच्या विरोधात जनमत नाही. इतक्या क्रूर आणि असहिष्णू राज्यकर्त्यांच्या विरोधात बहुसंख्य जनता आहे असे दिसत नाही. हे पुतिन यांचे वैशिष्टय़. आपल्या देशातील नागरिकांना पुतिन यांनी राष्ट्रवादाची अशी काही जालीम मात्रा चाटवलेली आहे की त्याचा परिणाम उतरण्याची लक्षणे अजून तरी नाहीत. रशियन भाषेचा अभिमान, आपल्या विरोधकांना सरसकट दहशतवादी ठरवण्याचे औद्धत्य आणि आपल्याला विरोध म्हणजे अमेरिका तसेच अमेरिकाधार्जिण्या नाटोस पाठिंबा असे पटवून देण्याचे कौशल्य हे पुतिन यांच्या राजवटीचे वैशिष्टय़ राहिलेले आहे. प्रखर राष्ट्रवादाचा अंगार एकदा का नागरिकांच्या मनात फुलवला की त्याची धग बराच काळ टिकते. किती ते पुतिन यांनी दाखवून दिले आहे. जॉर्जियाविरोधात चार वर्षांपूर्वी केलेले युद्ध, चेचन्यातील अनावश्यक हिंसाचार, नंतर क्रीमिया बळकावण्याची कृती आणि सीरियात असाद यांना दिलेला प्रच्छन्न पाठिंबा अशा अनेक उद्योगांना पुतिन यांनी राष्ट्रवादाचा मुलामा दिला. आपल्या राजकीय विरोधकांशी देशाच्या राष्ट्रवादाची मोट बांधण्याचे त्यांचे हे कौशल्य जगात पुढे अनेकांनी उचलले. त्यापैकी एक अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प. त्यांनी निवडणूक प्रचारकाळात नाटो बिनमहत्त्वाची असल्याचे म्हटले होते. रशियाच्या चालींची चाहूल लागल्यावर याच ट्रम्प यांना नाटो महत्त्वाची वाटू लागली आहे.

एका बाजूला हे असे विधिनिषेधशून्य पुतिन. तर दुसरीकडे दररोज टोप्या बदलणारे, वाह्य़ात, वावदूक डोनाल्ड ट्रम्प. आणि या दोघांत टर्की ते ऑस्ट्रिया अशा अनेक देशांतील वाढते एकाधिकारशाहीवादी. असे हे जागतिक वर्तमान.


एकही प्रतिक्रिया नाही

Comments have been closed.

लोकसत्ता 'ब्लॉग बेंचर्स'वरील ब्लॉगवर तुमची प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत तुमची प्रतिक्रिया शेअर करून त्यांना ती वाचायला आणि लाईक करायला जरूर सांगा. 'लोकसत्ता'च्या परीक्षक मंडळाच्या निर्णयाव्यतिरिक्त तुमच्या प्रतिक्रियेला मिळालेल्या लाईक्सचाही स्पर्धेचा विजेता/विजेती निवडताना विचार केला जाईल.