रेल्वेस महसुलाची टंचाई असल्याने रेल्वेने सरसकट वाढ करणे अपेक्षित होते. मात्र जनक्षोभाच्या भीतीने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ही दरवाढ केली नसावी. सरसकट तिकीट दरवाढ टाळण्याच्या अंगचोरीमुळे रेल्वेसमोरील प्रश्नाचे गांभीर्य संपण्यास संपूर्ण मदत होणार नाही. रेल्वे महसूलप्रणालीबाबत असे मत मांडणाऱ्या ‘झुलणे आणि झुलवणे’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

सरकारचा खर्च वाढता असल्याने वित्तीय व्यवस्थेवर ताण येतो. या वेळी महसुली तूटही वाढत जाते. तेव्हा प्रामाणिकपणे या वास्तवास भिडावे लागेल. आपले उत्तम चालू आहे, या समाजात राहिल्यास प्रगती खुंटेल. या वास्तवाला काही प्रमाणात भिडण्याचा प्रामाणिकपणा काही प्रमाणात का असेना रेल्वे मंत्रालयाने दाखवला. अन्य सरकारी खात्यांनी तो दाखवल्यास आर्थिक वास्तवावरून जनतेचे झुलणे थांबेल. असे स्पष्टपणे सांगणाऱ्या ‘देखावा आणि वास्तव’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना आपले मत मांडायचे आहे.

पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. या अग्रलेखांवर विद्यार्थ्यांना मत मांडणे सोपे व्हावे यासाठी ‘लोकसत्ता’ने वाहतूकतज्ज्ञ अशोक दातार आणि रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. अलोक बडकुल यांना बोलते केले आहे. त्यांच्या मतांचा विद्यार्थ्यांना लेखन करताना उपयोग होईल.

वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी हा लेख देण्यात आला आहे. आर्थिक सुधारणा, क्रिकेट, पर्यावरण, उद्योग, जातीयवाद आदी विषयांवर प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखांवर विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला. या स्पर्धेत स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे.

लक्षात ठेवावे असे..

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉग-इन करून विद्यार्थ्यांना आपले भूमिका मांडता येते. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी ’ loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.