तरुणांमधील अंगभूत विचारक्षमतेची जोपासना होण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या ‘ब्लॉग बेंचर्स’ या उपक्रमाच्या माध्यमातून संधी मिळेल, असे मत व्यक्त करत पुण्यातील प्राचार्य आणि प्राध्यापकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्य़ातील प्राचार्य आणि प्राध्यापकांची बैठक बुधवारी स. प. महाविद्यालयात झाली. या वेळी ‘ब्लॉग बेंचर्स’बाबत सादरीकरण करण्यात आले. आपल्याला ‘लोकसत्ता’चा हा उपक्रम आवडला, विद्यार्थी मुळात हुशार असतातच, प्राचार्य आणि प्राध्यापकांचे त्यांना प्रोत्साहन मिळाल्यास ते लेखनात पुढे जातील, अशा शब्दांत डॉ. गाडे यांनी या वेळी ‘ब्लॉग बेंचर्स’चे कौतुक केले. हा उपक्रम खास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यात ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या ठराविक अग्रलेखावरील दोन तज्ज्ञांची मते विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली जातील. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी ५०० ते ७०० शब्दांचे निबंधवजा टिपण लिहायचे आहे.
डॉ. गाडे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना लिहायला वाव मिळाल्यास चांगले लेखक निर्माण होऊ शकतील. पुण्याच्या ग्रामीण भागातील महाविद्यालयांना भेटी दिल्यावर त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी कल्पकता असल्याचे जाणवले. त्यांच्यात क्षमता आहेत परंतु शहरी मुलांकडे संज्ञापनाची साधने अधिक असल्याने आपण कमी पडू असा संकोचही आहे. या विद्यार्थ्यांसाठी ‘ब्लॉग बेंचर्स’ उत्कृष्ट व्यासपीठ आहे. लेखनाबद्दल विद्यार्थ्यांना नाव मिळण्याचे आकर्षण असल्यामुळे अधिक विद्यार्थी ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये सहभागी होतील.’’

कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्य़ातील प्राचार्य आणि प्राध्यापकांच्या बैठकीचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘लोकसत्ता’च्या ‘ब्लॉग बेंचर्स’ या उपक्रमाबाबत सादरीकरण करण्यात आले.