मते मांडण्याची विद्यार्थ्यांना संधी

एकीकडे दुष्काळाचे सावट आणि दुसरीकडे सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्यांना बसणारा फटका यावर परखड भाष्य करणाऱ्या ‘कारभारी बदलला, पण..’  या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये मत मांडायचे आहे.

तूरडाळीसाठी आधी सरकारने दर जाहीर केले, पण डाळ खरेदी केली नाही. शिवाय डाळींची आयात केल्याने शेतकऱ्यांची डाळ पडून राहिली. परिणामी त्यांचे सारे गणितच कोलमडले. उत्पादित मालाला भावही नाही आणि ती साठवून ठेवण्याची सोयही नाही, अशा स्थितीमुळे शेतकरी आणि ग्राहक अशा दोघांचीही कोंडी होऊ लागली आहे. अन्नधान्याची बेकायदा साठवणूक करणाऱ्या एकाही व्यापाऱ्याला शासनाने कठोर शिक्षा केलेली नाही.

मागील सरकारने जी पापे केली, त्याचीच पुनरावृत्ती सुरू असल्याने जनतेच्या मनात ‘कारभारी बदलला, पण कारभार नाही’ अशीच भावना निर्माण होण्यास मदत होईल याची जाणीव राज्यकर्त्यांनी ठेवावी, अशी समज दिलेल्या या अग्रलेखावर ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडायची आहे.

याच विषयावर नाशिक येथील कृषी अभ्यासक गिरीधर पाटील आणि नागपूर येथील कृषी अर्थतज्ज्ञ शरद पाटील यांची मते ‘लोकसत्ता’ने जाणून घेतली आहेत. या दोघांनीही या विषयाचा विविध दृष्टिकोनातून आढावा घेतला आहे. त्यांच्या मांडणीचा विद्यार्थ्यांना आपली भूमिका अधिक सुस्पष्टपणे मांडण्यास उपयोग होईल.

वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेचा हा आठवा लेख आहे.

लक्षात ठेवावे असे..

  • या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे आहे.
  • मते नोंदविण्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ.
  • indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळावर स्पर्धेतील सहभागासंबंधी माहिती उपलब्ध.
  • नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉगइन करून विद्यार्थ्यांना आपले भूमिका मांडता येते.
  • ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते.
  • किमान २५० शब्द व मराठीतील लेखनाचाच स्पध्रेसाठी विचार केला जाईल.
  • सहभागी होताना अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी ’ loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.