News Flash

‘ब्लॉग बेंचर्स’ विजेतीच्या वक्तृत्व शैलीने ‘भोसला’चे सभागृह मंत्र‘मुग्ध’..

समाजमाध्यमांवर तरुणांची भटकंती केवळ मित्र-मैत्रीणींशी संवाद साधण्यापुरती मर्यादित नाही.

‘लोकसत्ता ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलताना विजेती मुग्धा जोशी. समवेत उपस्थित विद्यार्थिनी.

समाजमाध्यमांवर तरुणांची भटकंती केवळ मित्र-मैत्रीणींशी संवाद साधण्यापुरती मर्यादित नाही. सामाजिकतेचे भान जपत त्याविषयी अभिव्यक्त होण्याकडेही त्यांचा कल आहे. एरवी महाविद्यालयाच्या कट्टय़ावर कोणत्याही विषयावर रंगणाऱ्या चर्चेला व्यक्त होण्यासाठी ‘लोकसत्ता ब्लॉग बेंचर्स’ हे हक्काचे व्यासपीठ मिळाल्याची भावना प्रथम पारितोषिक विजेती मुग्धा जोशी हिने व्यक्त केली.
लोकसत्ता’च्या ‘देखता – मृगजळाचे पूर’ या अग्रलेखावर मुग्धाने लिहिलेल्या ब्लॉगला राज्यात प्रथम पारितोषिक मिळाले.
मंगळवारी महाविद्यालयाच्या सभागृहात प्राचार्य डॉ. एस. एच. कोचरगावकर यांच्या हस्ते ‘लोकसत्ता’च्या वतीने मुग्धा हिला प्रमाणपत्र आणि धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी मुग्धाने वक्तृत्व शैलीचे दर्शन घडविले. आमच्या पिढीचा जेव्हा विचार केला जातो, त्यावेळी क्रीडा, फॅशन, मित्र परिवार वा चित्रपट या पलीकडे आमची झेप नाही, असा शिक्का अप्रत्यक्षपणे मारला जातो. परंतु, आजची तरुणाई सर्व काही वाचत असते. त्यातून योग्य मत घडवते. आजची तरुणाई वृत्तपत्रातील संपादकीय तितक्याच आत्मीयतेने वाचते हे राज्यभरातून ब्लॉग बेंचर्समध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरून लक्षात येते. तरुणांकडे चांगले विचार आहेत, मत आहे, त्यांना आपले विचार मोकळेपणाने मांडण्यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून चांगले व्यासपीठ मिळाले. युवा शक्तीच्या विचाराला योग्य वळण देण्याची गरज तिने अधोरेखित केली. बुद्धीला आव्हान देणारा वैचारिक संघर्ष स्पर्धापूरक वातावरण तयार करतो. आजवर वक्तृत्वाच्या माध्यमातून बोलण्याचा सराव आहे; मात्र एक ओळ लिहिण्यासाठी अवांतर वाचन किती महत्त्वाचे ठरते, याचा प्रत्यय या स्पर्धेमुळे आला. ब्लॉग बेंचर्ससह लोकसत्ताचे सर्व उपक्रम तरुणाईला मार्गदर्शन करणारे आहेत. विविध पैलू पाडण्याचे काम त्यांच्यामार्फत होत असल्याने महाविद्यालयीन युवकांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन तिने केले.
प्राचार्या कोचरगावकर म्हणाल्या, प्रसारमाध्यमाकडून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारा; तसेच महाविद्यालयात होणारा असा हा पहिलाच उपक्रम व सोहळा आहे. विविध स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे हे यश ‘नॅक’च्या मूल्यांकन प्रक्रियेत महाविद्यालयासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सैनिकी प्रशिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाकडून काही परंपरा जपल्या जातात. साडेतीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयात वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर पोहोचलेल्या माजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले जाते. भविष्यात मुग्धा जोशीही महाविद्यालयाची प्रमुख पाहुणी ठरेल. अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीत मुग्धाने लोकसत्ताच्या ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेत विभागीय पातळीवर उपविजेती ठरण्यासह अनेक स्पर्धामध्ये यश मिळविल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मुग्धाच्या या यशाबद्दल महाविद्यालयाने तिचा समई देऊन गौरव केला.
वितरण विभागाचे व्यवस्थापक वंदन चंद्रात्रे यांनी विद्यार्थिनींना ‘लोकसत्ता’च्या विविध उपक्रमांची माहिती दिली. व्यासपीठावर संपादकीय विभागाचे प्रमुख अविनाश पाटील, वितरण विभागाचे प्रसाद क्षत्रिय, महाविद्यालयाचे कर्नल यादव यांच्यासह मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियदर्शनी कुलकर्णी यांनी केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 1:20 am

Web Title: loksatta blog benchers is right platform says winner mugdha joshi
Next Stories
1 पालिकेचे माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर यांना अखेर अटक
2 कोळी महादेव समाजाचा मोर्चा
3 उत्तर महाराष्ट्रात वीज पडून एक ठार
Just Now!
X