आंतरराष्ट्रीय दबावामुळे नवे बौद्धिक संपदा धोरण आखणे आपणास भाग पडले असले तरी त्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदनच केले पाहिजे. त्यामुळे उचापती वा जुगाड करून वेळ मारून नेणाऱ्यांना आळा बसू शकणार आहे. या विषयावर ‘लोकसत्ता’मधील ‘जुगाड संस्कृतीचा अंत?’ या अग्रलेखावर व्यक्त होणारी नागपूरमधील ‘मॉरिस महाविद्यालया’ची प्रज्ञा लांडे ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसाची मानकरी ठरली आहे. तर, या स्पर्धेत हिंगोलीच्या ‘आदर्श एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालया’चा प्रणव खाडे याने दुसरे पारितोषिक पटकावले आहे.

बौद्धिक संपदेच्या मुद्दय़ावर जगात भारताचा ३७वा क्रमांक लागतो. त्यामुळे ही परिस्थिती भूषणावह नसल्याने ती बदलणे आवश्यक असल्याची जाणीव आपल्याला होती. परंतु आपले काही अडत नसल्याने आपण त्या गरजेकडे कानाडोळा करीत आलो. परिणामी उचलेगिरी आपल्याकडील राजमान्य उद्योग ठरला आहे. याच मुद्दय़ांचा ऊहापोह ‘जुगाड संस्कृतीचा अंत?’ या अग्रलेखात करण्यात आला होता. या अग्रलेखावर प्रज्ञा व प्रणव यांनी आपली मते ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत मांडली. प्रज्ञाला सात हजार रुपये आणि प्रमाणपत्र तर प्रणवला पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार असून या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल.

महाविद्यालयीन युवाशक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रत्येकवेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला आहे. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच, विद्यापीठांचे व प्राचार्याचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला लाभले  आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.