तालिबान व आयसिस या दहशतवादी संघटना सध्या एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. या दोन संघटनांच्या उभारणीमागे जगातील दोन मोठी राष्ट्रे दडली आहेत. यात तालिबानला अमेरिकेची रसद मिळाली, तर आयसिसलाही काही प्रमाणात रशियाची मदत मिळाली. परिणामी या दोन संघटना अमेरिका व रशिया या दोन महासत्तांची अनौरस संतती ठरतात. या विषयाचे गांभीर्य उलगडणाऱ्या ‘लोकसत्ता’मधील ‘अनौरसांचे आव्हान’ या अग्रलेखावर व्यक्त होणारा अहमदनगर जिल्हय़ातील श्रीरामपूर येथील ‘रावबहाद्दूर नारायणराव बोरावके’ महाविद्यालयातील लखनलाल भुरेवाल ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसाचा मानकरी ठरला आहे; तर या स्पर्धेत उस्मानाबाद येथील ‘एस. एम. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालया’चा आस्तिक काळे याने दुसरे पारितोषिक पटकावले आहे.
तालिबान स्वतला अफगाणिस्तानचा नैसर्गिक सत्ताधीश मानते, तर ‘आयसिस’ला संपूर्ण इस्लामी जग आपल्या आधिपत्याखाली आणायचे आहे. अफगाणिस्तानमधील तेलाच्या साठय़ांवर आपली मालकी असावी असा तालिबानचा अट्टहास आहे, तर इराकमधील तेलविहिरींवर ‘आयसिस’ने कब्जा केला आहे. मात्र, आता या दोन संघटनांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली असून याची झळ आपल्यालाही पोहोचणार आहे. त्यातच इस्लामी देशांचे राजकारण दोन्ही अनौरस दैत्यांना आपापले स्वार्थ साधत खतपाणी घालत असल्याने जगाचीही डोकेदुखी ठरणार आहेत. याच मुद्दय़ांचा ऊहापोह करण्यात आलेल्या ‘अनौरसांचे आव्हान’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांनी ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये आपली भूमिका मांडली. याच अग्रलेखावर लखन व अस्तिक यांनी आपली मते ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत मांडली. लखनलालला सात हजार आणि प्रमाणपत्र, तर आस्तिकला पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार असून या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल.
महाविद्यालयीन युवाशक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला आहे. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ प्रसिद्ध करण्यात येते. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकांची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच, विद्यापीठांचे व प्राचार्याचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला दिले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना यानिमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना loksatta.com/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.