नाशिकच्या उपविजेत्या सतीश नवलेचे मत
शालेय शिक्षणानंतर विज्ञान शाखा आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मातृभाषा अर्थात मराठी वाचनाची सवय काहीशी कमी होते. दै. ‘लोकसत्ता’ने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राबविलेला ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेचा उपक्रम अशा विद्यार्थ्यांना मराठी भाषेशी आपली नाळ जोडण्यास महत्त्वपूर्ण ठरणारा आहे, अशी भावना ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेतील विजेता सतीश नवले याने व्यक्त केली.
‘माझ्या मना बन दगड’ या अग्रलेखावरील स्पर्धेत त्याने द्वितीय क्रमांक मिळवला. नाशिकच्या मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सतीशला प्राचार्य डॉ. दिलीपराव डेर्ले यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. ‘लोकसत्ता’मधील अग्रलेख चालू घडामोडींबाबत सर्वागीण ज्ञान देणारे असतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विषय मातृभाषेत समजावत हे अग्रलेख विचार करण्यास प्रवृत्त करतात, असे त्याने नमूद केले. प्राचार्य डेर्ले यांनी अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांमध्ये दडलेले अनेक सुप्त गुण अशा स्पर्धामधून समोर येत असल्याचे सांगितले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अनेकदा संधी मिळत नाही; तथापि ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेमुळे शहरी व ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. वाचनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले मत मांडण्यासाठी उत्तम व्यासपीठ स्पर्धेने उपलब्ध केल्याचे डेर्ले यांनी नमूद केले.