ब्लॉग बेंचर्स विजेता सौदागर काळे याची भावना
‘लोकसत्ता’ हे माझ्यासाठी दुसरे विद्यापीठ असून ब्लॉगबेंचर्स ही माझ्यासारख्या अनेकांसाठी प्रेरणादायी स्पर्धा आहे,’ असे मत सौदागर किसन काळे यांनी व्यक्त केले. ‘लोकसत्ता ब्लॉग बेंचर्स’ मध्ये ‘माझ्या मना बन दगड’ या अग्रलेखावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील सौदागर काळे याने प्रथम क्रमांक मिळवला.
अकरावीपासून ‘कमवा आणि शिका’ योजनेच्या माध्यमातून शिक्षण घेणारा सौदागर सध्या कला शाखेतून अर्थशास्त्र विषयांत पदव्युतर पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ जे.जी.जाधव यांच्या हस्ते त्याला पारितोषिक देण्यात आले. यावेळी उपप्राचार्य बी. बी. जगताप, डॉ. एच. एम. लोंढे, प्रा.चौगुले, सोनावले, रजिस्ट्रार बाबासाहेब ओहाळ, संदीप जाधव, प्रा. एम. के. गजधने, डॉ. सुशील शिंदे यांच्यासह महाविद्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. जाधव म्हणाले, ‘अशा स्पध्रेमुळे राज्यातील गुणी विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळून देण्याचे काम ‘लोकसत्ता’ने केले आहे. आमच्या महाविद्यालयातील सौदागर काळे हा विद्यार्थी हुशार, प्रामाणिक आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘कमवा व शिका’, हा जो मूलमंत्र दिला आहे त्या पद्धतीने तो शिक्षण घेत आहे. सौदागरने कष्ट आणि जिद्दीतून मिळवलेले यश हे गौरवास्पद आहे.’