‘लोकसत्ता’चे उपक्रम हे नेहमीच नावीन्यपूर्ण असतात. यामुळे स्पर्धेत उतरण्याची तसेच जिंकण्याची ऊर्मी आपसूक मिळते, अशी भावना ‘लोकसत्ता ब्लॉग बेंचर्स’ उपविजेती काजल बोरस्ते हिने मांडली.

येथील हं. प्रा. ठा. महाविद्यालयातील वृत्तपत्र विद्या विभागाची विद्यार्थिनी काजलने लोकसत्ता ब्लॉग बेंचर्स स्पर्धेत ‘देव पाहाया कारणे’ या संपादकीयवर मत व्यक्त केले. स्पर्धेत तिला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. सोमवारी प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांच्या हस्ते तिला सन्मानित करण्यात आले. पाच हजार रुपये रोख व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी काजलने लोकसत्ता नेहमी सृजनतेला वाव देणारे उपक्रम आयोजित करत असल्याचे नमूद केले. लोकांकिका स्पर्धा असो वा वक्तृत्व स्पर्धा, या स्पर्धामध्ये आपला सहभाग राहिला असून वक्तृत्वची राज्य पातळीवर मी विजेती आहे. त्यावेळी बोलणे आणि बोलता येणे हा फरक त्या त्या दिग्गज मंडळीमुळे स्पर्धेच्या निमित्ताने अनुभवता आला. ब्लॉग बेंचर्समुळेही हेच घडले, असे ती म्हणाली. सूर्यवंशी यांनीही या उपक्रमांचे कौतुक केले.