ब्लॉग बेंचर्स विजेता पवन शिंदे पुरस्काराची रक्कम तांत्रिक उपकरणांसाठी खर्च करणार

मराठवाडय़ातील मराठवाडय़ाचे विद्यार्थी नेमके कुठे मागे पडतात, यासाठी जमेल तसे मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी तांत्रिक उपकरणे घेण्यासाठी पारितोषिकाची रक्कम आपण खर्च करणार असल्याचे ब्लॉग बेंचर्स विजेता पवन शिंदे याने सांगितले.

‘लोकसत्ता’च्या ब्लॉॅग बेंचर्स स्पर्धेत ‘देव पहाया कारणे’ अग्रलेखावर या महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षांत शिकणाऱ्या पवन रवींद्र िशदे याने प्रथम  पारितोषिक पटकावले. त्यानंतर मनोगत व्यक्त करताना पवनने या उपक्रमाचे कौतुक केले.

आमच्या कुटुंबात अनेक पिढय़ांमध्ये फारसे कोणी शिकले नव्हते. इयत्ता नववीत असताना वीणा गवाणकर यांचे ‘एक होता काव्‍‌र्हर’ हे पुस्तक वाचायला मिळाले. अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचले पाहिजे, अशी गोडी निर्माण झाली. त्यानंतर वाचत गेलो. ‘लोकसत्ता’ केवळ गुणवत्तेला प्राधान्य देतो; विद्यार्थी कोणत्या गावातील आहे याला नाही, हे लक्षात आले, असे त्याने सांगितले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असूनही त्यांना व्यक्त होण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे असे विद्यार्थी प्रकाशात येत नाहीत. ‘लोकसत्ता’ने अग्रलेखावर व्यक्त होण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले आणि दंत महाविद्यालयातील आमचा विद्यार्थी राज्यात पहिला आला. ‘लोकसत्ता’ने ही संधी दिल्यामुळेच हे घडले असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे यांनी व्यक्त केले.