24 November 2017

News Flash

सत्यजीत पुष्पा एकनाथ आणि ऋषिकेश ढवळे ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते

कोसळत्या बाजारातून परावर्तित होणाऱ्या नकारात्मक संदेशास ते घाबरत असते.

प्रतिनिधी, मुंबई | Updated: August 5, 2017 12:49 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

कोणतेही सरकार प्रतीकात्मकतेलाच महत्त्व देणारे असल्याने कोसळत्या बाजारातून परावर्तित होणाऱ्या नकारात्मक संदेशास ते घाबरत असते. म्हणून बाजार चढता राहिलेला बरा. कारण बाजार ही एक नशा आहे. सच्चा नशेकरी एका नशेतून बाहेर आल्यावर दुसऱ्या नशेच्या शोधात असतो. बाजाराचे तसे असते. भांडवली बाजाराच्या उसळीने सर्वसामान्यांनी हुरळून जाण्याचे कारण नाही. वास्तव वेगळे आहे. पण ते दिसू न देण्यात बाजारास लागलेल्या कोल्हे-लांडग्यांचे हितसंबंध असतात. सुशिक्षितांनी ते समजून घ्यायला हवे, इतकेच, असे मत ‘लांडगे आणि कोल्हे’ या अग्रलेखात मांडण्यात आले होते.

या अग्रलेखावर आपली भूमिका मांडत मुंबईतील सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी सत्यजीत पुष्पा एकनाथ हा ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरली आहे. या स्पर्धेत पुण्यातील शंकरराव चव्हाण विधि महाविद्यालयाचा विद्यार्थी ऋषिकेश ढवळे याने दुसरे पारितोषिक पटकावले.

अग्रलेखावर मत मांडणाऱ्या सत्यजीत आणि ऋषिकेश यांनी दर्जेदार लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. सत्यजीतला सात हजार आणि प्रमाणपत्र तर ऋषिकेशला पाच हजार  रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येईल.

या अग्रलेखावर व्यक्त होताना राज्यभरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना चालना देत उत्तम लेखन केले. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहेत. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना www.loksatta.com/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.

First Published on August 5, 2017 12:49 am

Web Title: loksatta blog benchers winner 44