‘लोकसत्ता’ ‘ब्लॉगबेंचर्स’ विजेत्यांच्या भावना
‘वाचनाची आवड होती म्हणूनच लिहिता आले. राजकीय घडामोडींवर व्यक्त होण्याची आणि लाखो लोकांपर्यंत मत पोहोचवण्याची मिळालेली संधी ही खूप मोठी आहे,’ अशा भावना ‘लोकसत्ता ब्लॉगबेंचर्स’ विजेत्यांनी व्यक्त केल्या. ‘सणसणीत श्रीमुखात..’ या अग्रलेखावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेला बबन सावंत आणि द्वितीय क्रमांक मिळवलेली युसिरा अत्तार यांना प्राचार्याच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
‘लोकसत्ता ब्लॉगबेंचर्स’ स्पर्धेत ‘सणसणीत श्रीमुखात..’ या अग्रलेखावर ब्लॉग लिहायचा होता. पुण्यातील व्हीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयांत शेवटच्या वर्षांला शिकणाऱ्या बबन सावंत याला या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. मूळचा बीडचा असलेला बबन स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. त्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव जालनेकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. यावेळी डॉ. जालनेकर म्हणाले, ‘अभियांत्रिकी शाखेत शिकत असताना विद्यार्थ्यांना सामाजिक, राजकीय विषयांवर व्यक्त होण्याची संधी फारशी मिळत नाही. मात्र संधी मिळाली तर विद्यार्थी आपल्या नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्तही विचार करू लागतात. अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेत असले तरीही विद्यार्थ्यांना सामाजिक विषयांची जाण असणे, भाषेचा वापर करणे, व्यक्त होता येणे आवश्यक असते. त्यादृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची आहे.’
बारामती येथील मुकुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाची विद्याíथनी युसिरा अत्तार हिला व्दितीय क्रमांक मिळाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सोमप्रसाद केंजळे यांच्या हस्ते युसिरा हिला पारितोषिक देण्यात आले. या वेळी उपप्राचार्य शिवाजीराव िशदे आणि डॉ जगन्नाथ सावळे यांच्यासह महाविद्यालयातील विद्याथी व विद्याíथनी उपस्थित होते. डॉ. केंजळे म्हणाले, ‘युसिराचा आवडीचा विषय इतिहास असतानादेखील राज्यशास्त्र विषयाशी संबंधित अग्रलेखावर तिने फार छान लेखन केले. विद्यार्थ्यांना विचार करायला लावणारा आणि त्यांची सामाजिक जाण वाढवणारा हा उपक्रम आहे.’

विजेते म्हणतात..
‘मी अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेतो. मात्र मी ग्रामीण भागांतून आलो आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या प्रश्नावर व्यक्त व्हायला मला आवडते. मी स्पर्धा परीक्षांचीही तयारी करत आहे. त्यासाठी मी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त वाचन करत असतो. त्याचा फायदा मला लिहिताना झाला. या स्पर्धेत पुढेही आवडीच्या विषयांवर मी लिहीत राहणार आहे.’’
– बबन सावंत, प्रथम क्रमांक

‘मला वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. हा छंद मी जोपासल्यामुळे मला यश मिळाले. लोकसत्ताच्या चोखंदळ वाचकांपर्यंत मला या स्पर्धेच्या माध्यमातून पोहोचता आले. ही संधी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि उत्साह वाढवणारी आहे.’’
युसिरा अत्तार, द्वितीय क्रमांक