आपल्या देशात काय होते यापेक्षा परदेशात काय झाले आणि तेथून आपल्यासाठी जी सुविधा आली तीच योग्य, अशी मानसिकता भारतीयांमध्ये आढळते. देशात होणाऱ्या संशोधनाबाबत कायम अनास्था दाखवणाऱ्या भारतीयांच्या या वृत्तीचा समाचार घेणाऱ्या ‘आपले भुवन आपले नाविक’ या ‘लोकसत्ता’मधील अग्रलेखावर व्यक्त होणारा औरंगाबादच्या ‘एमआयटी महाविद्यालया’चा शौनक कुलकर्णी ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसाचा मानकरी ठरला आहे. तर, या स्पर्धेत पुण्याच्या ‘त्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड रिसर्च’च्या ऋषभ बलदोता याने दुसरे पारितोषिक पटकावले आहे.
मूलभूत विज्ञानापेक्षा उपयोजित विज्ञानाचाच उदोउदो करण्याची एक अज्ञानजन्य संस्कृती आजच्या ‘वापरा आणि फेकून द्या’च्या काळात फोफावली आहे. आजही देशात शेकडो प्रयोग हे प्रत्यक्ष चाचणीवाचून प्रयोगशाळेतच पडून आहेत. मात्र, घरची कोंबडी डाळीसारखीच या वृत्तीमुळे कोणतीही समस्या उभी ठाकली की, आपले तोंड परदेशांकडे वळते. भारतीयांच्या याच वृत्तीवर ‘आपले भुवन आपले नाविक’ या अग्रलेखात निशाणा साधण्यात आला होता. याच अग्रलेखावर शौनक व ऋषभ यांनी आपली मते ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत मांडली. शौनकला सात हजार आणि प्रमाणपत्र तर हृषभला पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल.