20 February 2019

News Flash

लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची मोठी संधी

‘लोकसत्ता ब्लॉगबेंचर्स’ स्पर्धेत आपले ‘भुवन’, आपले ‘नाविक’ या अग्रलेखावर ब्लॉग लिहायचा होता.

ब्लॉग बेंचर्स विजेते शौनक कुलकर्णी, ऋषभ बलदोटा यांची भावना

‘वाचनाची आणि लिहिण्याची आवड होती. लाखो लोकांपर्यंत मत पोहोचवण्याची संधी खूप मोठी आहे. प्रत्येक विषयावर व्यक्त होताना त्याचा अभ्यास करावा लागतो आणि त्यातून  समजही वाढत जाते,’ अशा भावना ‘लोकसत्ता ब्लॉगबेंचर्स’ विजेत्यांनी व्यक्त केल्या. ‘आपले ‘भुवन’, आपले ‘नाविक’, या अग्रलेखावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेला शौनक कुलकर्णी आणि द्वितीय क्रमांक मिळवलेला ऋषभ बलदोटा यांना पारितोषिक देण्यात आले.

‘लोकसत्ता ब्लॉगबेंचर्स’ स्पर्धेत आपले ‘भुवन’, आपले ‘नाविक’ या अग्रलेखावर ब्लॉग लिहायचा होता. औरंगाबाद येथील एमआयटी महाविद्यालयांत वास्तुविशारद अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांला शिकणाऱ्या शौनक कुलकर्णी याला या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. त्याला एमआयटीचे संचालक मुनीष शर्मा यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश गोडियाल, वास्तुविशारद विभागप्रमुख संजय मस्के, प्राध्यापक भालकीकर, बोरावके, पाटील, विनय चिद्री, तसेच शौनकचे वडील राज्य आंग्लभाषा विभागाचे श्रीकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते. ‘लोकसत्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लिहिते करण्यासाठी सुरू केलेला ब्लॉग बेंचर्सचा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे,’ असे मत शर्मा यांनी व्यक्त केले.  प्राचार्य डॉ. गोडियाल म्हणाले,‘‘लिहिते होत गेल्यामुळे आपले म्हणणेही नेमकेपणाने मांडण्याची सवय लागते. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांना राजकारण, साहित्य, अर्थकारण,आदी क्षेत्रांत नवे काही करून दाखविण्यास प्रोत्साहन आणि बळ दिले आहे.’’ पुण्यातील ट्रिनीटी अभियांत्रिकी महाविद्यालयांतील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी ऋषभ बलदोटा याला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश डबीर यांच्या हस्ते त्याला पारितोषिक देण्यात आले.

लोकसत्ता’च्या नियमित वाचनामुळे वैचारिक घडण पक्की होण्यास मदत झाली. या स्पर्धेचे विजेतेपद मिळणे हा माझ्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरला आहे.

 – शौनक कुलकर्णी

मला लिहायला आवडते. मी आतापर्यंत प्रत्येक आठवडय़ाला ब्लॉग लिहिला आहे. यावेळचा विषय माझ्या आवडीचा होता. त्याची तयारी करताना मला खूप कठीण गेले नाही.

– ऋषभ बलदोटा

First Published on May 31, 2016 2:57 am

Web Title: loksatta blog benchers winner 9