18 November 2017

News Flash

प्रफुल्ल सुरवासे आणि अंकित तुरंबेकर ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते

अग्रलेखावर मत मांडणाऱ्या प्रफुल्ल आणि अंकित यांनी दर्जेदार लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी

प्रतिनिधी, मुंबई | Updated: June 24, 2017 1:17 AM

शिक्षणाचा समाजाच्या व पर्यायाने देशाच्या विकासाशी थेट संबंध असतो, याची जाणीव नसलेल्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या हाती सारा कारभार सोपवण्यात आल्याने सारेच चित्र अधिक धूसर बनत चालले आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर ‘गुरुजी तुम्हीसुद्धा?’असे विचारण्याची वेळ येणे त्या समाजाला रसातळाला नेणारे आहे, असे स्पष्ट मत ‘गुरुजी तुम्हीसुद्धा’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर आपली भूमिका मांडत सांगोला येथील ‘सांगोला महाविद्यालया’चा विद्यार्थी प्रफुल्ल सुरवासे हा ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेत इचलकरंजीजवळील यदरावच्या ‘शरद तंत्रनिकेतन संस्थेचा’चा विद्यार्थी अंकित तुरंबेकर याने दुसरे पारितोषिक पटकावले.

अग्रलेखावर मत मांडणाऱ्या प्रफुल्ल आणि अंकित यांनी दर्जेदार लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. प्रफुल्लला सात हजार आणि प्रमाणपत्र तर अंकितला पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. या अग्रलेखावर व्यक्त होताना राज्यभरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना चालना देत उत्तम लेखन केले.

महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहेत. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना www.loksatta.com/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.

 

First Published on June 24, 2017 1:17 am

Web Title: loksatta blog benchers winner ankit turambekar