रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा सभेत सीरियाविरोधातील निर्भर्त्सना ठराव हाणून पाडण्यासाठी आपला नकाराधिकार वापरला तर चीन तटस्थ राहिला. कमालीचा थंडपणा, विधिनिषेधशून्य राजकारण आणि प्रशासनाचा गळा घोटण्याची ताकद या पुतिन यांच्या वैशिष्टय़ांचा व दररोज टोप्या बदलणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वावदूक डोलाल्ड ट्रम्प यांच्या विचारांचा समाचार घेणाऱ्या विधिनिषेध व वावदूक या अग्रलेखावर आपली भूमिका मांडत मुंबईच्या ‘म. ल. डहाणूकर महाविद्यालया’चा विद्यार्थी गौरव आचार्य हा ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा’च्या सामान्य प्रशासन विभागाचा विद्यार्थी क्षितिज बर्वे याने दुसरे पारितोषिक पटकावले.

अग्रलेखावर मत मांडणाऱ्या गौरव आणि क्षितिज यांनी दर्जेदार लेखन करीत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. गौरवला सात हजार आणि प्रमाणपत्र तर क्षितिजला पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. या अग्रलेखावर व्यक्त होताना राज्यभरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना चालना देत उत्तम लेखन केले.

महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहेत. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.