‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे सरचिटणीस सलील शेट्टी यांनी भारतातील परिस्थितीवर केलेले भाष्य गंभीर आणि तितकेच चिंतनीय आहे. व्यवसायविस्ताराच्या मोहापायी जगाने चीन आणि भारतातील मानवी हक्कांच्या पायमल्लीकडे सातत्याने दुर्लक्ष केले. परंतु हे आर्थिक आकर्षण आता पूर्वीइतके राहिलेले नाही. हे वास्तव आहे. आणि ते महत्त्वाचे अशासाठी ठरते की त्यामुळे भारतातील असहिष्णू वर्तमानाची अधिकाधिक चिकित्सा आता जागतिक पातळीवर होऊ  लागली असून भारतासाठी ते अडचणीचे ठरणारे आहे. या संदर्भात ते संयुक्त राष्ट्राच्या जिनिव्हा येथील परिषदेचा दाखला देतात.  भारतातील वास्तवाची कठोर चिकित्सा व्हायला हवी, हा मतप्रवाह जगात सुदृढ होत असल्याचे त्यांचे मत म्हणूनच महत्त्वाचे. त्याची दखल सत्ताधारी घेतील, ही आशा. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा २०१६चा वार्षिक अहवाल जग हे कसे बंदिशाळा होऊ  घातले आहे, ते दाखवून देतो. या बंदिशाळेत भारताचाही समावेश होणे हे आपणास खचितच भूषणावह नाही, असे मत ‘जग हे ‘बंदी’शाळा..’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर आपली भूमिका मांडत लातूरमधील एमआयडीएसएल दंतवैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी पवन शिंदे हा ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेत पुण्यातील गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम कथले याने दुसरे पारितोषिक पटकावले.

अग्रलेखावर मत मांडणाऱ्या पवन आणि शुभम यांनी दर्जेदार लेखन करीत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. पवनला सात हजार आणि प्रमाणपत्र तर शुभमला पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे.

पारितोषिक रोखले

मागच्या आठवडय़ात जाहीर झालेल्या ‘लांडगे आणि कोल्हे’ या अग्रलेखावरील विजेत्यांमध्ये सत्यजित पुष्पा एकनाथ या विद्यार्थ्यांने प्रथम पारितोषिक पटकविल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर त्याचे लिखाण वाङ्मय चौर्याचा प्रकार असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सत्यजितला जाहीर करण्यात आलेले प्रथम पारितोषिक मागे घेण्यात येत आहे. सत्यजितच्या नावाने प्रसिद्ध झालेला ब्लॉग हा  विमा व कर सल्लागार व्यावसायिक प्रसाद भागवत यांचा आहे