‘ब्लॉग बेंचर्स’ची विजेती शालिनी शिरसाट हिची इच्छा
‘ब्लॉग बेंचर्स’च्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाची मानकरी ठरलेल्या शालिनी शिरसाट हिने बक्षिसादाखल मिळालेले सात हजार रुपये हैदराबाद विद्यापीठाच्या रोहित वेमुला याच्या कुटुंबीयांना देण्याची इच्छा व्यक्त करत आपल्या संवेदनशील विचारांना कृतिशीलतेचीही जोड असल्याचे दाखवून दिले.
‘लोकसत्ता’च्या ‘हुतात्मा’ मारुती कांबळे’ या अग्रलेखात उपस्थित केलेल्या जातीयतेच्या प्रश्नाला तिने आपल्या लेखनाद्वारे हात घातला होता. शालिनी शीव येथील ‘एसआयईएस’ महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिला महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. मंजू फडके यांच्या हस्ते गुरुवारी प्रमाणपत्र व धनादेश देऊन गौरविण्यात आले.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल ‘शिक्षा’ ठोठावणाऱ्या हैदराबाद विद्यापीठाच्या व्यवस्थापनावर रोहितचा राग होता. त्याच्या उपोषण आंदोलनानंतरही विद्यापीठाने त्याच्यावरील कारवाई मागे घेतली नव्हती. अखेर निराश होऊन रोहितने मृत्यूला कवटाळले. परंतु, असे अनेक ‘रोहित’ क्षुद्र राजकारणाचे कसे बळी पडत असतात यावर अग्रलेखात लक्ष वेधण्यात आले होते.
रोहितच्या कुटुंबीयांविषयी कळकळ व्यक्त करत तिने त्याच्या निराधार कुटुंबाला आपल्याकडून थोडी मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, बक्षिसाची रक्कम त्याच्या कुटुंबाला देण्याची इच्छा दर्शवीत आपल्यातील संवेदनशीलतेची साक्ष दिली.