जागतिक कीर्तीचे नामांकित आपल्या देशात तयार होत नाहीत आणि परदेशात जाऊन आलेले येथे टिकत नाहीत, हे पानगढियांच्या राजीनाम्याने पुन्हा दिसले. ज्ञानातून तयार झालेल्या निष्कर्षांशी केवळ पदासाठी तडजोड करावयाची वेळ आल्यास जे होते ते अरविंद पानगढिया यांचे झाले. अडीच वर्षांतच त्यांनी निती आयोगाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात विद्यादानासाठी परत जाऊ  इच्छितात. रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हेदेखील आपला भारत मुक्काम कमी करून शिकागो विद्यापीठात अध्यापनार्थ परत गेले. आता पानगढिया. साधारण एका वर्षांत जागतिक कीर्तीच्या दोन अर्थतज्ज्ञांनी भारत सरकारच्या सेवेपेक्षा परदेशात अध्यापकी करण्यास प्राधान्य दिले. ही घटना पुरेशी बोलकी ठरते. स्वदेशीच्या धर्माध पाठीराख्यांना यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरी हा आनंद अगदीच क्षुद्र ठरेल, असे मत ‘एक अरविंद राहिले..’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर आपली भूमिका मांडत डोंबिवलीमधील के. व्ही. पेंढरकार महाविद्यालयाचा विद्यार्थी वैभव बारसे हा ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरली आहे. या स्पर्धेत पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी स्वामी कुमार महादय्या याने दुसरे पारितोषिक पटकावले.

अग्रलेखावर मत मांडणाऱ्या वैभव आणि स्वामी कुमार महादय्या यांनी दर्जेदार लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. वैभवला सात हजार आणि प्रमाणपत्र, तर स्वामी कुमारला पाच हजार  रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येईल.

प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकांची बक्षिसे काढली जातात.  विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना यानिमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers  या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.