नरेंद्र मोदी यांची ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ ही दर्पोक्ती किती पोकळ आहे हे सिद्ध करून दाखवणाऱ्या अनेक उदाहरणांतील एक म्हणजे प्रकाश मेहता. महाराष्ट्राचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता हे व्यवसायजन्य गल्लाकेंद्रित उत्पन्न वगळता सामाजिक, राजकारणादी अन्य कशासाठी विख्यात आहेत असे नाही. विनोदी जाणिवेसाठी तर नाहीच नाही. परंतु तरीही त्यांनी गतसप्ताहात विनोद केला. विविध घोटाळ्यांत त्यांचे नाव प्रकर्षांने पुढे येऊ लागल्यावर हे मेहता म्हणाले: मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यास मी निश्चित राजीनामा देईन. असे विधान करून मेहता हे अलीकडच्या काळातील काही अन्य अशा विनोदी राजकारण्यांच्या पंगतीत येऊन बसले. विरोधकांना हाताशी धरून पक्षातील एखाद्या मंत्र्याचा पत्ता कापणे राजकारणात सुरूच असते. यापूर्वीही तसे झाले आहे. पाहुण्याच्या वहाणेने विंचू मारणे असा एक वाक्प्रचार मराठीत आहे. राजकारणात त्याचे रूपांतर विरोधकांच्या वहाणेने सहकारी मारणे असे होते. मेहता यांचेही असेच होणार हे निश्चित. पक्षासाठी नाही तरी स्वत:च्या प्रतिमेसाठी तरी देवेंद्र फडणवीस यांना प्रकाश मेहता यांना घालवावेच लागेल, असे मत ‘ विरोधकांच्या वहाणेने..’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर आपली भूमिका मांडत कोल्हापूरमधील जेनेसिस तंत्रज्ञान संस्थेच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी विनायक घोरपडे हा ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेत पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाची विद्यार्थिनी पल्लवी नारळेने दुसरे पारितोषिक पटकावले.

अग्रलेखावर मत मांडणाऱ्या विनायक आणि पल्लवी यांनी दर्जेदार लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. विनायकला सात हजार आणि प्रमाणपत्र तर पल्लवीला पाच हजार  रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. या अग्रलेखावर व्यक्त होताना राज्यभरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना चालना देत उत्तम लेखन केले. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहेत. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते.  विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षणतज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते.