एकिकडे दुष्काळाचे सावट आणि दुसरीकडे सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना बसणाऱ्या फटका परिणामी सामान्यांपर्यंत पोहचणारी त्याची झळ यावर परखड भाष्य करणाऱ्या ‘कारभारी बदलला, पण..’ या अग्रलेखावरील लेखन स्पर्धेचा पहिल्या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे, पुण्याच्या ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’चा अर्षद अतार. तर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विजय रहाणे या विद्यार्थ्यांने पटकविले आहे.
विजेता ठरलेल्या अर्षदला सात हजार आणि प्रमाणपत्र तर विजयला पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. बक्षीसाच्या रकमेबरोबरच या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
राज्यातील दुष्काळावर पखड भाष्य करणाऱ्या या अग्रलेखावर मत नोंदविताना अर्षद आणि विजय यांनी ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये आपल्या विचार आणि लेखन शैलीची चुणूक दाखवून दिली. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रत्येकवेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला आहे.

प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षक तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षीसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच, विद्यापीठांचे व प्राचार्याचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला दिले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरूणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.