मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांचे प्रतिपादन
सध्याच्या तरुण पिढीच्या विचारसरणीला पथदर्शी ठरणारा ‘लोकसत्ता’चा ‘ब्लॉग बेंचर्स’ हा उपक्रम मराठी भाषेचे संवर्धन करेलच; पण तरुणांना लिखाणासाठीही उद्युक्त करेल, असा ठाम विश्वास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी मंगळवारी व्यक्त केला. पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या रायगड तसेच ठाणे जिल्ह्य़ातील महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या बैठकीत डॉ. देशमुख बोलत होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विचारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे राबवण्यात येणाऱ्या ‘ब्लॉग बेंचर्स’ या उपक्रमाचे या बैठकीत सादरीकरण करण्यात आले.
आजच्या तरुण पिढीच्या विचारांना ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवरील १४० शब्दांच्या मर्यादेत अडकवून न ठेवता त्यांना आपले विचार अधिक व्यापकपणे मांडता यावेत, या हेतूने ‘लोकसत्ता’ने ‘ब्लॉग बेंचर्स’ या उपक्रमास सुरुवात केली आहे. हा उपक्रम अधिकाधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, या हेतूने मंगळवारी पनवेल येथे प्राचार्याच्या बैठकीत त्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. देशमुख यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामध्ये मुंबई विद्यापीठाला सहभागी करून ‘लोकसत्ता’ने उपकृत केले आहे, अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना देणारा तसेच लिहिण्यासाठी प्रवृत्त करणारा हा उपक्रम सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यानी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीला मुंबई विद्यापीठाच्या ‘महाविद्यालये तसेच विद्यापीठ विकास मंडळा’चे (बीसीयूडी) संचालक डॉ. अनिल पाटील, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य सिद्धेश्वर गडदे यांच्यासह रायगड व ठाणे जिल्ह्णाातील जवळपास ८० महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक तसेच प्रतिनिधी उपस्थित होते. विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यानी या उपक्रमाचे कौतुक करताना अत्यंत उत्साहाने सहभागी होण्याची तयारी दर्शवली. या उपक्रमाशी संबंधित विद्यार्थ्यांच्या अनेक शंका आणि प्रश्नांचे निरसनही यावेळी करण्यात आले.

‘ब्लॉग बेंचर्स’ हा उपक्रम केवळ मराठी विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर अमराठी विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहित करणारा आहे. यामुळे जास्तीत जास्त अमराठी विद्यार्थी मराठी भाषेशी समरस होतील. निबंधाची शब्दमर्यादा ७०० आहे. ती थोडी कमी केल्यास आणखी विद्यार्थी यात सहभागी होतील. ‘लोकसत्ता’चा हा स्तुत्य उपक्रम आहे.
-प्राचार्य कामाक्षी वैद्य, भारती विद्यापीठ, बेलापूर
****
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लिखाणासाठी मोठी व चांगली संधी ‘लोकसत्ता’ने या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी मराठीकडे वळतील व भाषेच्या संवर्धनाला हातभार लागेल.
-प्रा. श्रीमती रावन, ए. काळसेकर महाविद्यालय, पनवेल<br />****
मी स्वत: मराठी नाही. पण माझ्यासारख्या अनेकांना मराठी कळू लागल्यानंतर या भाषेविषयी प्रेम वाटू लागले आहे. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमामुळे अमराठी विद्यार्थ्यांमध्येही मराठीची गोडी निर्माण होईल.
-डॉ. अमी ओझा, देवकी बा महाविद्यालय, सिल्वासा
****
अतिशय चांगला उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना अशी वैचारिक मेजवानी मिळणार असल्यास त्यांच्या विचारांत प्रगल्भता येईल. त्यांनी विचार करून लिहिण्याचा हा उपक्रम खूप चांगला व स्वागतार्ह आहे.
-डॉ. माधुरी पेजावाल,
बा. ना. बांदोडकर महाविद्यालय, ठाणे<br />****
‘लोकसत्ता’चा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी वाचन व लिखाणाच्या चळवळीचे केंद्र व्हावे. ‘ब्लॉग बेंचर्स’मुळे मराठी भाषेचे संवर्धन होईल, अशी आशा आहे.
-डॉ. शकुंतला चव्हाण, मोरे महाविद्यालय, पोलादपूर

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी
* स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी सुरू झाली असून त्यासाठी indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळावर भेट द्या. नोंदणी झाल्यावर तुम्ही स्पर्धेत सहभागी होऊ शकता.
* ही स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली असणार आहे. तुमच्या लिखाणातील मुद्दे, त्यांची वैचारिक समज आदींच्या आधारे दर आठवडय़ास दोन विद्यार्थ्यांचे निबंध निवडले जातील.
* यातील पहिल्या निबंधाला सात हजार, तर दुसऱ्या क्रमांकाच्या निबंधाला पाच हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.
* ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर व मुख्य अंकात प्रसिद्धी दिली जाईल. विजेत्यांना त्यांच्याच महाविद्यालयात समारंभात प्राचार्याच्या हस्ते पारितोषिक दिले जाईल.
* अधिक माहितीसाठी वाचत राहा ‘लोकसत्ता..’