महाराष्ट्राला वाद विवादासह आपले मत ठामपणे मांडण्याची परंपरा असताना ती काहिशी खंडित झाल्याचे प्रकर्षणाने जाणवते. असे का झाले याचा विचार केला असता बदलती सामाजिक परिमाणे आणि काळानुरूप अभिव्यक्त होण्याची बदललेली माध्यमे याकडे त्या त्या वेळी समाज आकर्षित होत गेला. मात्र ‘लोकसत्ता’ने हा बदल टिपत ‘ब्लॉग बेंचर्स’च्या माध्यमातून युवा स्पंदने टिपण्याचा प्रयत्न उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले. निमित्त होते, ‘लोकसत्ता’तर्फे सुरू होणाऱ्या ‘लोकसत्ता ब्लॉग बेंचर्स’ या उपक्रमानिमित्त येथे आयोजित बैठकीचे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेची माहिती देण्यासाठी नुकतीच बैठक झाली. त्यात शहर परिसरातील कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, औषध निर्माणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, आयुर्वेद आदी महाविद्यालयांतील प्राचार्य उपस्थित होते.
आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जामकर यांनी समाजमाध्यमे संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून काम करत असल्याचे नमूद केले. एका तपापासून या माध्यमांचे प्रस्थ देशात वाढत आहे. स्पर्धेचे कौतुक करताना केवळ अग्रलेखा मत-मतांतरापर्यंत या व्यासपीठावरील चर्चा न थांबता तिची व्याप्ती वाढवावी, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या वैचारिक क्षमतेला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.