महाविद्यालयीन युवांच्या लेखणीला वाव देण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे सुरू झालेल्या ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेमध्ये या आठवडय़ात मुंबईच्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. देशात फाशीच्या शिक्षेत दुर्बल व मागास घटकांनाच सफर व्हावे लागत असल्याचा निष्कर्ष गुन्हेगारांवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दिसून आला होता. या विषयावर ‘लोकसत्ता’मधील ‘दुर्बलांपुढेच दबंग’ अग्रलेखावर व्यक्त होणारा मुंबईतील ‘डी. जी. रूपारेल महाविद्यालया’चा ओमकार माने ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकाच्या बक्षीसाचा मानकरी ठरला आहे. तर, या स्पर्धेत मुंबईच्याच ‘रामनारायण रूईया महाविद्यालया’ची रुची मांडवे हीने दुसरे पारितोषिक पटकावले आहे. भारतात फाशीच्या शिक्षेसंदर्भात कोणतेही न्यायतात्विक एकमत नाही. फाशीच्या भितीने गुन्ह्यांस प्रतिबंध होतो, गुन्हे कमी होतात अथवा गुन्हेगारांना जरब बसते हे दाखवून देणारा कोणताही पुरावा नाही. असे खुद्द सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशांनाच वाटत असेल तर फाशीच्या शिक्षेने प्रश्न सुटतात हे मानणाऱ्या मूढ जनांनी या संदर्भात विचार करण्याची गरज या अग्रलेखात व्यक्त करण्यात आली होती. तसेच, फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांचा व ते ज्या राज्यातील आहेत तेथील राजकीय वातावरणाचा संबंध असल्याचे या सर्वेक्षणात मांडण्यात आले असून याद्वारे आपल्या व्यवस्थेतील दबंगगिरी फक्त दुर्बलांविरोधात होत असल्याचे ‘दुर्बलांपुढेच दबंग’ या अग्रलेखात अधोरेखीत करण्यात आले होते.
याच अग्रलेखावर ओमकार व रुची यांनी आपली मते ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत मांडली. ओमकारला सात हजार आणि प्रमाणपत्र तर रुचीला पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल.