सियाचेनच्या बर्फाळ भूमीवर गेली कित्येक वर्षे सुरू असलेल्या भारत-पाक संघर्षांवर भाष्य करणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘हकनाक हणमंतप्पा’ या अग्रलेखावरील लेखन स्पर्धेचा मानकरी ठरला आहे, औरंगाबादच्या ‘माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालया’चा विद्यार्थी सौरभ कुलकर्णी. तर ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठा’चा आणि ठाण्याचा राहणारा चिन्मय पाटील याने या आठवडय़ाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसावर नाव कोरले आहे.

सौरभ सात हजार रुपयांच्या तर चिन्मय पाच हजार रुपयांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसाचा मानकरी ठरला आहे. बक्षिसाच्या रकमेबरोबरच या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

सियाचेनच्या गोठवणाऱ्या बर्फाळ प्रदेशात ३० कोटी डॉलर खर्च करून भारत पाकिस्तानपासून संरक्षण करत असला तरी हा संघर्ष कसा निर्थक आहे, यावर या अग्रलेखात सडेतोड भाष्य करण्यात आले होते. ‘लोकसत्ता’त ११ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘हकनाक हणमंतप्पा’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांनी ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये आपली भूमिका मांडली होती.

महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेत आतापर्यंत सात आठवडय़ाचे विजेते घोषित करण्यात आले आहेत. आर्थिक सुधारणा, क्रिकेट, पर्यावरण, उद्योग, जातीयवाद अशा विविध विषयांवर प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखांवर विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला.

या स्पर्धेत प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षक तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात.

पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच विद्यापीठांचे व प्राचार्याचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला दिले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात.

‘लोकसत्ता’च्या वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते.

या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.

सौरभ कुलकणी व चिन्मय पाटील
सौरभ कुलकणी व चिन्मय पाटील