Untitled-15

‘लोकसत्ता ब्लॉगबेंचर्स’ मध्ये पुण्याने सलग दुसऱ्या आठवडय़ात बाजी मारली आहे. पुण्याच्या एच. व्ही. देसाई महाविद्यालयातील नागनाथ खरात या विद्यार्थ्यांला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. नागनाथ इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. त्याचा एक कवितासंग्रही प्रसिद्ध झाला असून, त्याला चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात काम करायचे आहे. महाविद्यालयातील छोटेखानी समारंभात नागनाथचा कौतुक समारंभ गुरूवारी करण्यात आला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते नागनाथला पाच हजार रुपयांचा धनादेश आणि प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी उपप्राचार्य डॉ. गणेश राऊत उपस्थित होते.

डॉ. राऊत म्हणाले, ‘‘चांगले आणि विचार करणारे विद्यार्थी मिळणे हे शिक्षकांचे भाग्यच असते. त्यात या विद्यार्थ्यांना चांगले व्यासपीठ मिळणे, त्यांना सिद्ध करण्याची संधी मिळणे ही खूप आनंदाची गोष्ट असते. हा आनंदाचा क्षण ‘लोकसत्ता’ने दिला. ही स्पर्धा म्हणजे विचार करायला प्रवृत्त करणारी एक संधी आहे.

अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. नागनाथमुळे महाविद्यालयाचे नाव राज्यभर पोहोचले आहे, त्याचा आनंद वाटतो.’’

‘लोकसत्ता’ची भूमिका तटस्थ आणि समतोल असते. त्यामुळे त्यातील लेखांवर व्यक्त व्हावेसे वाटते. सध्याच्या सामाजिक परिस्थितीत अनेक गोष्टी अस्वस्थ करत असतात. पण त्यावर व्यक्त होण्यासाठी संधी मिळत नाही. ती संधी या स्पर्धेने दिली. मी स्पर्धा म्हणून सहभागी झालो नव्हतो. मला माझे म्हणणे मांडायचे होते, त्यासाठी हे व्यासपीठ मला महत्त्वाचे वाटले. पुढेही या स्पर्धेत विविध विषयांवर व्यक्त होत राहीन.

नागनाथ खरात, स्पर्धेतील विजेता