ऊर्जेअभावी आपल्या देशाचा विकास खुंटला असून मिळेल त्या मार्गाने जास्तीत जास्त वीजनिर्मिती करण्यातच आपले हित आहे. ते लक्षात घेऊन आणि आपण आधी केलेला विरोध ‘विसरून’ मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणून कौतुकास्पद ठरतो. हे मोदी सरकारच्या दहा अणुभट्टय़ांना परवानगी देण्याच्या ताज्या निर्णयाचे आणखी एक वैशिष्टयम्. या मुद्दयावर भाजपने मनमोहन सिंग सरकारवर टीकेची झोड उठवली होती. सत्ताधारी झाल्यावर आता भाजप हेच धोरण राबवेल. जीएसटी ते जीएम बियाणे ते अणुऊर्जा अशा अनेक मुद्दयमंवर मोदी सरकारने आपल्या डोक्यावरील संघीय टोपी फिरवली आहे. यापैकी काही निर्णय हे अंतिम देशहितासाठी आवश्यक असल्याने मोदी सरकारचे हे घूमजाव शहाणपणाचे आणि प्रागतिक ठरते असे मत सोमवारी प्रसिद्ध झालेल्या ‘स्वागतार्ह घूमजाव’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहायचा आहे.

प्रस्तावित १० अणुभट्टयांतून तब्बल सात हजार मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होऊ शकेल. मोदी मंत्रिमंडळाने या निर्णयावर अंतिम मोहोर उठवली. १९७४ साली पहिल्या अणुचाचणीमुळे आणि १९९८ सालच्या अणुचाचण्यांनंतर आपणास आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठय़ा आण्विक अस्पृश्यतेस सामोरे जावे लागले.

बडय़ा देशांनी आपल्यावर टाकलेल्या आंतरराष्ट्रीय अणू बहिष्कारास माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अमेरिकेशी अणुकरार करून मूठमाती दिली. तरीही विविध कारणांनी अणुऊर्जा क्षेत्रातील आपली प्रगती तोतरीच राहिली. मोदी सरकारच्या ताज्या निर्णयाने हे तोतरेपण संपण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे, असे मत या अग्रलेखात व्यक्त करण्यात आले आहे. पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. विद्यार्थ्यांना मत लिहणे सोपे जावे म्हणून या अग्रलेखावर भाभा अणु संशोधन केंद्राचे माजी वैज्ञानिक आल्हाद आपटे आणि डॉ. मंगेश सावंत यांना बोलते केले आहे.

लक्षात ठेवावे असे..

स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.

या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी l loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.