खरेदी-विक्री व्यवहारात एकदा वस्तू विकली गेली की नंतर तिचे काय करायचे हे सांगण्याचा अधिकार ती विकणाऱ्यास नसतो. केंद्र सरकारला. विशेषत: पर्यावरण मंत्रालयास. हे साधे तत्त्व माहीत नसावे असा ठाम निष्कर्ष काढता येईल. याचे कारण या मंत्रालयाने घेतलेला ताजा निर्णय. १९६० सालच्या ‘प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टु अ‍ॅनिमल’ या कायद्यात या मंत्रालयाने एकतर्फी दुरुस्ती केली असून देशभरात ठिकठिकाणच्या आठवडी बाजारात होणाऱ्या दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवर गदा आणली आहे, असे मत सोमवारी प्रसिद्ध झालेल्या ‘रक्तलांच्छित शाकाहार’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहायचा आहे.

गाईस मातेचा दर्जा देणाऱ्या या देशात रस्तोरस्ती या अनाथ उपाशी गोमातांचे जथेच्या जथे आपल्या देहाचे न पेलवणारे सांगाडे ओढत पोटापाण्यास काही मिळेल या आशेने हिंडताना का दिसतात? हे गाईबैल बेवारस होतात कारण त्यांचे आयुष्य संपवण्याचा अधिकार त्यांच्या मालकांना नसतो म्हणून.

भाकड झालेल्या जनावरांना शास्त्रशुद्ध पद्धतीने मुक्ती देण्याचा मार्ग उपलब्ध असेल तर कोणताही जनावर मालक त्यांना असे वाऱ्यावर सोडणार नाही. परंतु भावनेच्या भरात हे मान्य करावयाची आपली तयारी नसल्याने या बेवारस गोमाता आपल्या डोळ्यांतील असाहाय्य भकासपणा दाखवत आला दिवस रेटत असतात. आता त्यांची अवस्था अधिकच वाईट होईल. नवहिंदुत्ववाद्यंच्या दबावाखाली झुकणाऱ्या सरकारकडे हा विचार करण्याची कुवत नाही. गोवा, प. बंगाल, केरळ, हरयाणा, पंजाब, महाराष्ट्र, संपूर्ण ईशान्य भारत आदी अनेक प्रांतांनी सरकारच्या या निर्बुद्ध निर्णयाविरोधात आवाज उठवला असून प्रकरण न्यायालयीन लढाईत अडकेल अशी चिन्हे आहेत. न्यायालय तरी तो रद्दबादल ठरवेल, अशी आशा. कारण या निर्णयामुळे जनावरांचे अधिकच अहित होणार आहे. शाकाहाराचा हा रक्तलांच्छित प्रचार रोखायलाच हवा, असे मत या अग्रलेखात व्यक्त करण्यात आले आहे. पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल.  हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. विद्यार्थ्यांना मत लिहणे सोपे जावे म्हणून या अग्रलेखावर ज्येष्ठ कृषितज्ज्ञ गिरीधर पाटील यांना बोलते केले आहे.

वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी या वेळी ‘रक्तलांच्छित शाकाहार’ हा अग्रलेख देण्यात आला आहे.

लक्षात ठेवावे असे..

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.