विकासाचा सर्वकष विचारच आपल्याकडे होत नाही. तसे करणे हे एकमेकांच्या हितसंबंधांना बाधा आणणारे आहे असे आपल्याला वाटते. तेव्हा एकमेकांना मागे टाकत पुढे जाण्याच्या ईष्र्येत हा अपघात घडला असे म्हणून नागरिकांना दोष देण्याऐवजी आधी आपल्या धुरिणांनी हा व्यवस्थेतील बदल घडवायला हवा, असे मत ‘मी आणि माझे..’ या अग्रलेखात मांडण्यात आले होते. एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या विषयावर हा अग्रलेख आहे.

एल्फिन्स्टन पुलावरील अपघाताचा विचार करताना परळ भागाचा वेगाने विकास झाला, पण तेथे नव्याने सोयीसुविधा निर्माण केल्या नाहीत, याकडेही पाहावे लागेल. सातत्याने सुधारणा होत असतानाही आपल्याकडे सुधारणा होताना का दिसत नाहीत, या प्रश्नाचे   प्रामाणिक उत्तर आपल्या व्यवस्थेच्या बालिश हाताळणीत आहे. ते कसे हे समजून घ्यायचे असेल तर आधी आपल्याकडे समस्यांना मिळणारा प्रतिसाद कसा असतो आणि प्रत्यक्षात तो कसा असायला हवा, याची सविस्तर चर्चा व्हायला हवी. ती करायची कारण व्यवस्थेच्या आणि एकंदरीतच व्यवस्थानिर्मितीच्या याच बालिश हाताळणीमुळे एल्फिन्स्टन रोड स्थानकात २४ जणांचा केवळ चेंगराचेंगरीत मृत्यू झाला, असे विचार ‘मी आणि माझे..’ या अग्रलेखात व्यक्त करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेन्चर्स’मध्ये याच अग्रलेखावर व्यक्त व्हायचे आहे. या स्पर्धेअंतर्गत पुढच्या गुरुवापर्यंत (१२ ऑक्टोबपर्यंत) विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल.  हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील.

वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी दर आठवडय़ाला एक अग्रलेख निवडला जातो. त्यावर विद्यार्थ्यांनी आपले भाष्य करायचे असते. या आठवडय़ाकरिता ‘मी आणि माझे..’ या अग्रलेखाची निवड करण्यात आली आहे. स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ात शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना भूमिका मांडता येते. ‘मी आणि माझे’ या अग्रलेखावर ज्येष्ठ लेखक, विचारवंत अवधूत परळकर आणि उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाचे प्रमुख संघटक नंदकुमार देशमुख  यांनी विशेष टिप्पणी व्यक्त केली आहे. त्याचा संदर्भ म्हणून विद्यार्थ्यांना उपयोग करता येईल.

या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी  loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.