पित्याच्या संपत्तीत मुलींना वाटा मिळण्याबाबत इस्लाम धर्म जितका पुढारलेला आहे तितका हिंदू नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे वारसा हक्कासाठी हिंदू महिलांना संघर्ष करावा लागला. याचा अर्थ इतकाच की प्रत्येक धर्मात काही ना काही डावेउजवे हे तसे असतेच. तेव्हा यातील डावेपण दूर करून जे काही चांगले आहे त्याचा स्वीकार करण्यास हरकत नाही. तसे करताना आपले हिंदुधर्मीय बांधव धर्मास मागे तर नेत नाहीत, हे पाहण्याची जबाबदारीदेखील सरकारचीच आहे. महिलांनी आरोग्यासाठी घरी धुणीभांडी करणे उत्तम अशी निलाजरी भाषा करणारे आपल्या पक्षात असतील तर त्यांनाही सुधारणेचा स्पर्श कसा होईल ते पंतप्रधानांनी पाहावे. सद्य:परिस्थितीत मुसलमान महिलांच्या डोळ्यातील तलाकचे मुसळ दूर करणे गरजेचे आहे, हे मान्यच. परंतु ते दूर करण्याचे अभिनंदनीय पाऊल उचलत असताना आपल्याही डोळ्यातील कुसळ दूर करता आले तर त्यामुळे धर्माकडे पाहण्याची नजर अधिक निकोप होईल. सर्वच धर्मातील अभद्रास आज तलाक देण्याची गरज आहे. या विषयावर सांगोपांग विवेचन २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘सर्वधर्मीय तलाक’ या अग्रलेखात करण्यात आले आहे. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेन्चर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे. या स्पर्धेअंतर्गत पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल.

वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी दर आठवडय़ाला एक अग्रलेख निवडला जातो. त्यावर विद्यार्थ्यांनी आपले भाष्य करायचे असते. या आठवडय़ाकरिता ‘सर्वधर्मीय तलाक’ या अग्रलेखाची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना  indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी  loksatta.blogbenchers@expressindia.com मेलवर संपर्क साधावा.