देशात फाशीची शिक्षा सुनवण्यात आलेल्या गुन्हेगारांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाचे तपशील बघितले तर विचारी जनांची मान शरमेने झुकल्याखेरीज राहणार नाही. या शिक्षेत देशातील दुर्बल व मागास घटकांनाच सफर व्हावे लागत असल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणात दिसून आला आहे. त्यामुळे भारतासारख्या देशात कायद्यापुढे जसे काही अधिक समान असतात तसेच काही अभागी अधिक असमानही असतात, हे विदारक सत्य दाखवण्याचा प्रयत्न ‘दुर्बलांपुढेच दबंग’ या अग्रलेखातून करण्यात आला आहे. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.
भारतात फाशीच्या शिक्षेसंदर्भात कोणतेही न्यायतात्विक एकमत नाही. फाशीच्या भीतीने गुन्ह्य़ांस प्रतिबंध होतो, गुन्हे कमी होतात अथवा गुन्हेगारांना जरब बसते हे दाखवून देणारा कोणताही पुरावा नाही. असे खुद्द सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशांनाच वाटत असेल तर फाशीच्या शिक्षेने प्रश्न सुटतात हे मानणाऱ्या मूढ जनांनी या संदर्भात विचार करण्याची गरज या अग्रलेखात व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांचा व ते ज्या राज्यातील आहेत तेथील राजकीय वातावरणाचा संबंध असल्याचे या सर्वेक्षणात मांडण्यात आले असून याद्वारे आपल्या व्यवस्थेतील दबंगगिरी फक्त दुर्बलांविरोधात होत असल्याचे या अग्रलेखात अधोरेखीत करण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेंचसर्’मध्ये आपली भूमिका मांडायची आहे. पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. या विषयावर ‘लोकसत्ता’ने विधिज्ञ अनंत वडगावकर यांना बोलते केले आहे. त्यांच्या मतांचा विद्यार्थ्यांना मत मांडताना उपयोग होणार आहे.
लक्षात ठेवावे असे
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉग-इन करून विद्यार्थ्यांना आपले भूमिका मांडता येते. स्पर्धेत सहभागी होण्यात अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.