हिरानंदानी रुग्णालयात किडनीचोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर डॉक्टरांना दोषी ठरवणाऱ्या प्रतिक्रिया येत असल्या तरी यात विकणारा व विकत घेणारा दोघेही दोषी असतात. मात्र आपल्या इथल्या ‘सामाजिक प्रथे’प्रमाणे काळास दोष दिला की झाले. तो दोष दूर करण्याची जबाबदारी आपल्यावर नाही आणि दोषींना शासन करण्याचे कर्तव्यही आपले नाही. हे समस्या विश्लेषणाचे सुलभीकरण केल्याने कोणत्याही अपकृत्यांचा दोष आपल्यावर येत नाही. समाजाच्या या वृत्तीचा समाचार ‘देऊळ ते दवाखाना’ या अग्रलेखात घेण्यात आला आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

मूत्रपिंडचोरीचे आणि त्यातील डॉक्टरांच्या सहभागाचे अनेक प्रकार आतापर्यंत उघडकीस आले आहेत. तरीही ते थांबवण्याचा प्रयत्न होत नाही. याचे कारण ते थांबवण्याचे अधिकार असलेले आणि ते न थांबवण्यात ज्यांचा फायदा आहे असे हितसंबंधी एकच आहेत. अशी अवयवचोरी थांबली तर रांगेत न थांबता अवयव कोणाला मिळू शकतील या प्रश्नाच्या उत्तरात अवयवचोरी का थांबत नाही हे सत्य दडलेले आहे. ती थांबवायची इच्छा असेल तर अशी अवयवचोरी जेथे घडते ते रुग्णालय, त्यात सहभागी डॉक्टर यांच्यावर अशा गुन्हय़ांसाठी कायमस्वरूपी बंदी हवी. अशी भूमिका घेणाऱ्या या ‘देऊळ ते दवाखाना’ या अग्रलेखावर आपले मत मांडायचे आहे. पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या  indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना मत मांडणे सोपे व्हावे यासाठी ‘लोकसत्ता’ने भारतीय वैद्यक परिषदेच्या नैतिक समितीचे अध्यक्ष राहिलेले डॉ. अरुण बाळ आणि ‘लोकसत्ता’चे ‘वरिष्ठ सहसंपादक’ संदीप आचार्य यांना बोलते केले आहे. त्यांच्या मतांचा विद्यार्थ्यांना मत मांडताना उपयोग होणार आहे. वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉग बेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी हा लेख देण्यात आला आहे. आर्थिक सुधारणा, क्रिकेट, पर्यावरण, उद्योग, जातीयवाद आदी विषयांवर प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखांवर विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला.

लक्षात ठेवावे असे..

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना loksatta.blogbenchers@expressindia.com या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉग-इन करून विद्यार्थ्यांना आपले भूमिका मांडता येते. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी https://loksatta.com/blogbenchers या ई-मेलवर संपर्क साधावा.