भारतातील दूरसंचार बाजारपेठ ही स्वस्तातील स्वस्तास चटावलेली असून त्यास जबाबदार या दूरसंचार कंपन्याच आहेत. यात जिओच्या प्रवेशामुळे भर पडली असून याने दूरसंचार बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. मात्र व्यवसाय आकर्षित करण्यासाठीच्या या अतिस्वस्ताईच्या खेळात अंतिमत: सर्वच खेळाडू गुडघे फोडून घेतात. हा इतिहास आहे. मुकेश अंबानींच्या जिओ मोबाइल सेवेला सुरुवात झाल्यानंतर दूरसंचार क्षेत्राबाबत स्पष्ट मत ‘जिओ जीवस्य जीवनम’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

दूरसंचार सेवेचा भरमसाट वापर करणारे श्रीमंत ग्राहक मोठय़ा प्रमाणावर जिओकडे वळवावे लागणार असून हा वर्ग दरांबाबत संवेदनशील नसतो. स्वस्त दराने उत्साहित होतात ते तळातील ग्राहक. त्यामुळे स्वस्ताईच्या नावाखाली ग्राहकाला भुरळ घालण्याचा हा खेळ दूरसंचार कंपन्या नेहमीच खेळतात. जिओनेही यात भर घातली असून प्रतिस्पर्धी कंपन्यांचा जीव घेण्यासाठी सुरू झालेल्या या खेळात आपलाच जीव घायकुतीला येणार नाही, याची काळजी जिओस घ्यावी लागणार असल्याचा स्पष्ट  संदेश देणाऱ्या ‘जिओ जीवस्य जीवनम’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना आपले मत मांडायचे आहे. पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. या अग्रलेखांवर विद्यार्थ्यांना मत मांडणे सोपे व्हावे यासाठी ‘लोकसत्ता’ने मुंबई ग्राहक पंचायतीचे शिरीष देशपांडे यांना बोलते केले आहे. त्यांच्या मतांचा विद्यार्थ्यांना लेखन करताना उपयोग होईल.

वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी हा लेख देण्यात आला आहे. आर्थिक सुधारणा, क्रिकेट, पर्यावरण, उद्योग, जातीयवाद आदी विषयांवर प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखांवर विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला. या लेखन स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यांच्या निर्भीड लेखणीला वाट करून देणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विद्यापीठांची व महाविद्यालयांचीही मोलाची साथ लाभली आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉग-इन करून विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.