शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात, त्यामागील मुख्य कारणे म्हणजे त्यांच्या गुंतवणुकीवर मिळणारा अपुरा परतावा. उदाहरण म्हणजे शेतकऱ्यांनी डाळी लावाव्यात, असे सरकारला वाटत असेल तर दोन पर्याय उपलब्ध आहेत. उसासह सर्व पिकांचे हमीभाव रद्द करणे किंवा डाळीसह सर्व पिकांना ते लावणे. सरकार हे दोन्हीही करीत नसल्याने असंतुलन तयार होते व शेतकऱ्यांचा बळी जातो. राज्यातील शेतकऱ्यांच्या या सद्य:परिस्थितीवर ‘बळीराजा आणि बाजारपेठ’ या अग्रलेखात भाष्य करण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

गेल्या वर्षांत झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा तपशील सरकारने अधिकृतपणे जाहीर केलेला नाही. आणि यामागे केवळ योगायोग असू शकत नाही. एकूण या संदर्भात सरकारचा लौकिक पाहता पत्रकार पी. साईनाथ यांच्या आरोपात तथ्य असण्याची शक्यता अधिक आहे. असे स्पष्ट प्रतिपादन या अग्रलेखात करण्यात आले आहे. शेतकरी आणि बाजारपेठ यातील गुंतागुंत व सरकारचा धोरणलकवा या अग्रलेखात अधोरेखित करण्यात आला असून विद्यार्थ्यांना याच अग्रलेखावर ब्लॉग लिहायचा आहे. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना मत मांडणे सोपे व्हावे यासाठी ‘लोकसत्ता’ने कृषितज्ज्ञ गिरधर पाटील आणि समाजशास्त्राचे अभ्यासक विश्वंभर चौधरी यांना बोलते केले आहे. त्यांच्या मताचा विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहिताना उपयोग होणार आहे. पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील.

हे लक्षात ठेवा..

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉग-इन करून विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी ’ loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.