महाराष्ट्रात विनोदाची जाण नाही हे मराठी भाषक घरात जन्माला येऊनही तुम्हांस समजू नये? तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्हीच.. साक्षात शिवयरायांना तुम्ही नीज रे असे अरेतुरे म्हणता? त्यात तुमचा जिवाजी पंत! विनोदी पात्र असले, नाटकात असले, प्रसंग दहा मिनिटांचा असला, म्हणून काय झाले? असे परखड बोल सुनावत भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवणाऱ्यांचा आपल्या तिरकस शैलीतून ‘अहो.. राम गणेश..’ या अग्रलेखात समाचार घेण्यात आला आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

राम गणेश.. अहो या राज्यात मराठी वाचायची बोंब. त्यात कोण वाचणार तुमच्या कविता? हे पुरे नाही म्हणून की काय राम गणेश तुम्ही विनोदी वाङ्मयाच्या वाटय़ास गेलात अहो.. केवढी ही चूक! असे सवाल उपस्थित करून भाषाप्रभू गडकरी यांचा पुतळा पाडण्याचे निंदनीय कृत्य करणाऱ्यांचीच कीव या अग्रलेखामार्फत करण्यात आली आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहायचा आहे. या अग्रलेखावर मत मांडणे विद्यार्थ्यांना सोपे जावे यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘लोकसत्ता’चेच वरिष्ठ साहाय्यक संपादक दिनेश गुणे आणि वरिष्ठ साहाय्यक संपादक राजीव काळे यांना बोलते केले आहे. त्यांच्या मतांचा विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहिताना उपयोग होणार आहे. पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल.

लक्षात ठेवावे असे..

या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी ’ loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.