समाजाचा म्हणून जो शहाणपणा असतो, त्याचे रूपांतर पाहता पाहता सामाजिक उन्मादात कसे होते किंवा केले जाते याचा उत्तम नमुना म्हणजे जलिकट्टू आंदोलन. एखादा समाजचा समाज क्रूर खेळातून आनंद लुटू इच्छितो ही गोष्ट काही त्या समाजाच्या शहाणपणाबद्दल आणि सुसंस्कृतपणाबद्दल बरे बोलणारी नाही. असे स्पष्ट प्रतिपादन ‘कासरा सुटला’ या अग्रलेखात करण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

तामिळनाडूत सत्ताधारी प्रादेशिक पक्ष नेतृत्वहीनतेच्या वाटेवर येऊन ठेपला आहे हे जलिकट्टू आंदोलनास लागलेल्या वळणांतून स्पष्ट झाले.

प्रादेशिक पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या अपयशाचा आणखी एक पैलू आहे तो व्यवस्थाशून्यतेचा. तो सरतेशेवटी लोकशाहीला झुंडशाहीच्या मार्गाने एकाधिकारशाहीकडेच घेऊन जाणारा ठरू शकतो. असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहायचा आहे.

या अग्रलेखावर मत मांडणे विद्यार्थ्यांना सोपे जावे यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘लोकसत्ता’चेच वरिष्ठ साहाय्यक संपादक दिनेश गुणे यांना बोलते केले आहे. त्यांच्या मतांचा विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहिताना उपयोग होणार आहे.

लक्षात ठेवावे असे..

  • स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.
  • ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते.
  • नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी ’ blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.