सहा दशकांच्या सत्तानुभवाने काँग्रेस पक्षाच्या अंगावर मेद चढलेला असून परिणामी या पक्षाचे नेतृत्व आपले चापल्य हरवून बसले आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षावर टीका इतकाच काय तो या पक्षाचा कार्यक्रम दिसून येत आहे. काँग्रेसला आता हृदयआरोपणाची गरज आहे. हे करत असताना दुसऱ्याच्या शरीरातील हृदय रुग्णाच्या शरीरात बसवायचे आणि पुन्हा ते धडधडू लागेल अशी व्यवस्था करावयाची. यात मोठीच जोखीम असते आणि रुग्ण दगावण्याचा धोका असतो. पण तरीही ही अवघड शस्त्रक्रिया केली जाते, कारण ती नाही केली तर मरण अटळ असते. तेव्हा हा अखेरचा पर्याय काँग्रेसला निवडावाच लागेल. कारण प्रश्न काँग्रेस तगणार की नाही, हा नाही. देशात लोकशाहीच्या रक्षणासाठी पर्याय उभा राहणार की नाही हा खरा प्रश्न आहे. एखाद्या पक्षाच्या जगण्यामरणापेक्षा ही लोकशाही अधिक मोठी आहे. ती जिवंत राहायला हवी अशी भूमिका ‘ती तगायला हवी..’ या अग्रलेखामध्ये मांडली आहे.

गांधी घराण्याकडे निवडणुका जिंकून देण्याची क्षमता नाही हे अनेक निवडणुकांतून दिसून आले आहे. त्यामुळे आता सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे, जतीन प्रसाद आदी नव्या दमाच्या नेत्यांना काँग्रेसने पुढे करायला हवे आणि त्यांचे नेतृत्व घडवायला हवे असे मत या अग्रलेखात मांडले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहायचा आहे. या अग्रलेखावर ‘लोकसत्ता’चे राजकीय संपादक संतोष प्रधान आणि मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक मृदुल निळे यांना बोलते केले आहे. त्यांच्या मतांचा विद्यार्थ्यांना उपयोग होणार आहे.

  • स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.
  • ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी blogbenchers@expressindia.com  या ई-मेलवर संपर्क साधावा.