संतोष सरीकर आणि रवी प्रकाश देशमुख ब्लॉग बेंचर्सचे विजेते

हा इतिहासाने घेतलेला सूड म्हणता येईल

विचारस्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या त्या आणीबाणीच्या विरोधात लढणाऱ्यांत वसुंधराराजे यांच्या मातोश्री विजयाराजे शिंदे या आघाडीवर होत्या. आता त्याच राजमातांची कन्या इंदिरा गांधी यांनी केलेली चूक करू पाहते, हा इतिहासाने घेतलेला सूड म्हणता येईल. या मुद्दय़ाचा विसर वसुंधराराजे यांना पडला तरी हरकत नाही; परंतु असा निर्णय घेणाऱ्या इंदिरा गांधी यांची पुढे किती राजकीय वाताहत झाली, हे त्यांनी विसरू नये. पूर्वीच्या काळी वाईट बातमी घेऊन येणाऱ्याचा शिरच्छेद करण्याचा आदेश चक्रम राजे देत. आज या राजे प्रसारमाध्यमांची अशी अवस्था करू इच्छितात. त्यांनी लक्षात ठेवायचे ते इतकेच की, ‘ती’ राजेशाही गेली. ही राजेशाही काही अमरपट्टा घेऊन आलेली नाही. या देशात स्वत:स राजे मानणारे कित्येक आले आणि गेलेही. प्रसारमाध्यमे मात्र कायम आहेत. या विषयावर सांगोपांग विवेचन ‘आले राजे, गेले राजे’ या अग्रलेखात करण्यात आले आहे. या अग्रलेखावर आपली भूमिका मांडत इस्लामपूर येथील एन. एस. सोटी विधि महाविद्यालयाचा विद्यार्थी संतोष सरीकर ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरली आहे. या स्पर्धेत शिवाजी महाविद्यालयाचा विद्यार्थी रवी प्रकाश देशमुख याने दुसरे पारितोषिक पटकावले.

महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहेत. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta blog benchers winner