अतिवेगवान, सुस्पष्ट आणि मिळेल तेथून माहिती महाजालात शिरण्याची सुविधा तर हवी, परंतु त्यासाठी दाम तर मोजावयास नको, असे म्हणून चालणारे नाही. यासाठी गुंतवणूक करणाऱ्यांचा हेतू काही धर्मार्थ असणार नाही. त्यांनाही नफ्याची आस आणि गरज असणारच. अशा वेळी या नफ्याच्या हेतूने त्यांनी माहिती महाजालात ग्राहकांना आकर्षून घ्यायचे, पण नंतर  ग्राहकांनी गुंतवणूकदाराकडे दुर्लक्ष करायचे हे अर्थतत्त्वात बसणारे नाही. परंतु तरीही नेट न्यूट्रलिटीचा उद्घोष केला जातो. तो करताना नेटवर नियंत्रण नको ही मागणी जरी योग्य असली तरी मुळात नेटची निर्मिती ही मोफत नाही, हे आधी लक्षात घ्यायला हवे. टीम बर्नर्स ली या तंत्रज्ञ अभियंत्यांच्या संगणकांना जोडण्याच्या कल्पनेतून नेटचा जन्म झाला. ही घटना १९८९ सालची. म्हणजे नेटने अद्याप वयाची तिशीही गाठलेली नाही. पण तरीही ते सर्वव्यापी बनले आहे आणि त्याने आपले जगण्याचे परिमाण बदलले आहे. तेव्हा या महाजालाच्या मोहजालात अर्थशास्त्रालाही आता बदलावे लागणार असून नेट न्यूट्रलिटीच्या मुद्दय़ाने हेच आव्हान उभे केले आहे. या विषयावर सांगोपांग विवेचन ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘महाजालाचे मोहजाल’ या अग्रलेखात करण्यात आले आहे. यावर आपली भूमिका मांडत औरंगाबाद येथील एमआयटी वास्तुरचनाशास्त्र महाविद्यालयाचा विद्यार्थी शौनक कुलकर्णी ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. तर परभणीतील कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी गोविंद मस्के याने दुसरे पारितोषिक पटकावले.