‘नेचर’च्या लेखक चमूने जगभरातील सुमारे साडेतीन हजार शोधनिबंधांचा अभ्यास केला. त्यातील एक हजार ९०७ शोधनिबंध हे दर्जाहीन बनावट पत्रिकांमध्ये प्रकाशित झाल्याचे आढळून आले. हे शोधनिबंध जैववैद्यकीय विषयावरचे होते. त्यांपैकी २७ टक्के शोधनिबंध हे भारतीय प्राध्यापक-संशोधकांचे होते आणि त्यात महाराष्ट्रातील काही संस्था आणि महाविद्यालयांचाही समावेश होता. विद्यापीठ अनुदान आयोगाने सात वर्षांपूर्वी केलेल्या कायद्यानुसार प्राध्यापकांना पगारवाढ आणि पदोन्नतीसाठी अन्य काही अटींबरोबरच असे शोधनिबंध प्रकाशित करणे आवश्यक करण्यात आले होते. त्यासाठी काही गुण देण्यात येत होते. जगभरच्या बनावट शोधनिबंधांत एकटय़ा भारताचा वाटा २७ टक्के आहे, ही विचार करायला लावणारी बाब आहे. शिक्षण क्षेत्रातील या महत्त्वाच्या विषयावर सांगोपांग विवेचन ‘बनावटांचा बकवाद’ या अग्रलेखात करण्यात आला आहे.

या अग्रलेखावर आपली भूमिका मांडत अभिषेक शरद माळी ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेत अमित महाजन याने दुसरे पारितोषिक पटकावले. या अग्रलेखावर मत मांडणाऱ्या अभिषेक आणि अमित यांनी दर्जेदार लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. अभिषेकला सात हजार आणि प्रमाणपत्र तर अमितला पाच हजार  रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे.

या अग्रलेखावर व्यक्त होताना राज्यभरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना चालना देत उत्तम लेखन केले. महाविद्यालयीन युवाशक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहेत. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना यानिमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना loksatta.blogbenchers@expressindia.com या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.

नवा विषय ‘नवा बॉम्बे क्लब’?

२१ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘नवा ‘बॉम्बे क्लब’?’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेन्चर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी दर आठवडय़ाला एक अग्रलेख निवडला जातो. त्यावर विद्यार्थ्यांनी आपले भाष्य करायचे असते. या आठवडय़ाकरिता ‘नवा ‘बॉम्बे क्लब’?’ या अग्रलेखाची निवड करण्यात आली आहे. ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो.

  • स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.com/Blogbenchers मेलवर संपर्क साधावा.