देशभरात विविध नेत्यांचे दबावगट संघटनांच्या माध्यमातून स्वत:साठी अवकाश तयार करण्याचे काम करीत आहे. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या हिंदू युवा वाहिनीच्या वाढत्या प्रस्थाविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून प्रश्न उपस्थित करणे ही स्वागतार्ह घटना आहे, असे स्पष्ट मत बुधवारी प्रसिद्ध झालेल्या ‘योगी आणि टोळी ’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहायचा आहे.

योगी आदित्यनाथ यांची हिंदू युवा वाहिनी परधर्मीयांत मुख्यत: मुस्लीमांविषयी द्वेष निर्माण करीत आहे. जातीय सलोख्यासाठी ही संघटना स्थापन केली असे आदित्यनाथ म्हणत असले तरी मूळात या संघटनेच्या विरोधात जाळपोळ, दंगल घडवून आणणे असे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे अशा संघटनेला रोखणे आवश्यक असून भविष्यात ही संघटना भाजप व संघ परिवारावर उलटण्याची शक्यता आहे, असे मत या अग्रलेखात व्यक्त करण्यात आले आहे. पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. विद्यार्थ्यांना त्यांचे मत मांडणे सोपे जावे म्हणून ‘लोकसत्ता’चे राजकीय संपादक संतोष प्रधान यांना बोलते केले आहे.

वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी या वेळी ‘योगी आणि टोळी’ हा अग्रलेख देण्यात आला आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers  या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.