दारिद्रय़ हे केवळ आर्थिकच असते असे नाही. ते सांस्कृतिकही असते, शैक्षणिकही असते. समाज सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा श्रीमंत असेल, त्याचा गाडा धीमंत चालवत असतील, तर दारिद्रय़ावर मात करता येते. पण दारिद्रय़च सांस्कृतिक आणि शैक्षणिक असेल, तर सगळा समाज रसातळाला जाण्यास वेळ लागत नाही. जगभरच्या बनावट शोधनिबंधांत एकटय़ा भारताचा वाटा २७ टक्के आहे, ही विचार करायला लावणारी बाब आहे. समाजातील सर्व प्रतिकूलतेवर मात करून ज्ञानाची उपासना करणे हेच ‘विद्यार्थी’ आणि ‘गुरू’चे भागधेय आणि त्यांना धीमंत बनण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करून देणे हे समाजाचे कर्तव्य. जेव्हा दोघांनाही त्याचा विसर पडतो, तेव्हा मग साऱ्याच बाबींचा बाजार सुरू होतो. आज तोच जोरात सुरू आहे. विद्यापीठे ही आजची राजकीय कुरुक्षेत्रे बनली आहेत. विद्यार्थ्यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत आणि त्यांचे गुरुजन वाङ्मयशर्वलिक बनून श्रेण्या आणि वेतनवाढीच्या स्पर्धेत धावत आहेत. ही आपल्या ज्ञानक्षेत्राची गत. हे सारे अत्यंत निराशाजनक, काळोखे वाटेल. परंतु ते तसेच आहे. आता आपण सर्वानीच शहामृगाप्रमाणे वाळूत तोंड खुपसून बसायचे ठरविले असेल, तर मग सारेच संपले. आणि एकदा सर्वाचेच शहामृग झाले, की मग काय, बनावटांच्या बकवादातही ज्ञानामृतच दिसणार. या विषयावर सांगोपांग विवेचन २ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘बनावटांचा बकवाद’ या अग्रलेखात करण्यात आले आहे. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेन्चर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे. या स्पर्धेअंतर्गत पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल.

वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी दर आठवडय़ाला एक अग्रलेख निवडला जातो. त्यावर विद्यार्थ्यांनी आपले भाष्य करायचे असते. या आठवडय़ाकरिता ‘बनावटांचा बकवाद’ या अग्रलेखाची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यर्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी  loksatta.blogbenchers@expressindia.com मेलवर संपर्क साधावा.