‘लोकसत्ता ब्लॉग बेंचर्स’चा निरोप घेताना..

राज्यभरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देणारे सदर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपास आलेल्या ‘लोकसत्ता ब्लॉग बेंचर्स’च्या आजवरच्या विजेत्यांनी ‘लोकसत्ता’ने या माध्यमातून विचार, शब्दसंपदा आणि सकस आणि समतोल लिखाण कसे करावे, याची अभंग देणगी दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशातून ही स्पर्धा सुरू केली. यात विद्यार्थ्यांनी व्यक्त होताना राजकीय, सामाजिक, आर्थिक तसेच परराष्ट्र धोरण, नीती, न्याय, घटना, संगीत आणि कला क्षेत्रातील घटनांवर प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखांवर  प्रगल्भ लिखाण केले.

पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. तरुणाईच्या या ‘लिहितेपणा’मुळे ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना त्यातील अंतरंग समजून घेण्याची संधी मिळाली. या सदराच्या समारोपाला विजेत्या विद्यार्थ्यांनी नव्या विचारांनिशी भविष्याला सामोरे जाण्याचा निर्धार बोलून दाखवला. ‘ब्लॉग बेंचर्स’मुळे आयुष्याला नवी दिशा मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

‘ब्लॉग बेंचर्स’मुळे लिखाणाला प्रगल्भता आली. परराष्ट्र नीती आणि युद्ध या विषयांवरच वाचणारा मी, या सदरानंतर चौफेर विषयांवरील वाचनात रमलो. लिखाणात प्रगल्भता आली.   – विनायक घोरपडे

‘ब्लॉग बेंचर्स’मधील लिखाणामुळे मी नक्कीच संशोधनपर लिखाणाला प्राधान्य देईन, असा आत्मविश्वास आला आहे. अग्रलेख बारकाईने वाचताना माझ्या शब्दसंपदेत भर पडत गेली. नित्य वाचनाची सवय जडली. शब्द कसे, कोणत्या वेळी आणि का वापरायचे याचे भान आले.   – रेणुका पिलारे